

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बेकायदा पिस्तूल जवळ बाळगणार्या एका सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली. लोहगावमधील फॉरेस्ट पार्क परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष शंकर गुंजाळ (26, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुंजाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, खूनाचा प्रयत्न, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
विमानतळ पोलिसांचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना गुंजाळ हा येथील फॉरेस्ट पार्क परिसरात थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तूल असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गुंजाळ याला अटक केली. त्याने फॉरेस्ट पार्क येथील मोठ्या सिंमेंटच्या पाईपमध्ये पिस्तूल लपून ठेवले होते. बुधवारी तो पिस्तूल घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचीन जाधव कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, रुपेश पिसाळ, प्रदीप मोटे यांच्या पथकाने केली.
गुंजाळ याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल त्याने हडपसरमधील त्याचा साथीदार असलेल्या सराईत गुंड सनी हिवाळे याच्याकडून घेतल्याचे व हिवाळे याने ते त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. म्हसोबा चौक काळेबडळ येथे एका टोळक्याने हिवाळे याचा एप्रिल महिन्यात खून केला आहे.