England vs India 2nd Test : भारताची सामन्यावर मजबूत पकड; ३ बाद २७६ पर्यंत मारली मजल | पुढारी

England vs India 2nd Test : भारताची सामन्यावर मजबूत पकड; ३ बाद २७६ पर्यंत मारली मजल

लंडन : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड ( England vs India 2nd Test ) यांच्यातील दुसरी कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या दिवशी सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारताने ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. केएल राहूल १२७ धावांवर खेळत आहे तर अजिंक्य रहाणे १ धावा करुन नाबाद आहे.

दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी सलामीवीर केएल राहूल याने लार्डस् वरील ऐतिहासिक शतक झळकावले. तर रोहित शर्मा याने ८३ धावांची मोठी खेळी करुन माघारी परतला. तर चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरत अवघ्या ९ धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने राहूलला चांगली साथ देत ४२ धावांची उपयुक्त खेळी केली पण तो देखिल मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. पण, संपूर्ण दिवसभर भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व प्रस्तापित केले. त्यामुळे इंग्लडला फक्त ३ बळींवरच समाधान मानवे लागले. अखेर भारताने ३ बाद २७६ धावा केल्याने सामन्यावर महत्त्वपूर्ण पकड मिळवली आहे. आता दुसऱ्या दिवशी भारत इंग्लंडवर धावांचा किती डोंगर उभा करु शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारत आणि इंग्लंड ( England vs India 2nd Test ) यांच्यातील दुसरी कसोटी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पावसामुळे खेळ उशीरा सुरुवात झाली. भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. रोहित शर्माने संधी मिळताच आक्रमक फटके मारुन भारताचा धावफलक हालता ठेवला. तर दुसऱ्या बाजूने केएल राहुलने सावध भुमिका घेतली.

पण, ही जोडी जमली असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा आपला खेळ सुरु केला. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या १८. ४ षटकात बिनबाद ४६ धावा झाल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे लंच लवकर घेण्यात आला.

त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर रोहित – राहुलने भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. दरम्यान, आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित सोबत असलेल्या केएल राहुलने रोहितला एका बाजूने संयमी साथ दिली. या दोघांनी भारताला शतकी सलामी करुन दिली.

शतकी भागीदारीनंतर केएल राहुलनेही आपला गिअर बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. दरम्यान रोहितही आपल्या शतकाजवळ पोहचला होता. मात्र जेम्स अँडरसनने ८३ धावांवर त्याचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि पुजाराने भारताला १५० पर्यंत पोहचवले.

मात्र त्यानंतर अँडरसनने पुजाराला ९ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पुजारा बाद झाल्यानंतर भारताने चहापानापर्यंत ५२ षटकात २ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

चहापान ( England vs India 2nd Test )

चहापानानंतर केएल राहूल आणि विराट कोहली यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. विराटनेही राहूल चांगली साथ दिली. दोघांनी एकेरी आणि दुहेरी धावांचा चांगला रतीब घातला. अधून मधून राहूल सोबत विराट देखिल बॉलला सीमापार पाठवत होता. दरम्यान ७७. ३ व्या षटकात मार्क वूड याला चौकार ठोकत लॉर्डस् वरील आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले.

दरम्यान शेवटच्या दहा ओव्हर शिल्लक असताना इंग्लडने नवा बॉल खेळण्यास घेतला. नव्या बॉलने रॉबिन्सन आणि ॲडरसन यांनी मारा सुरु केला. नव्या चेंडूवर राहूल दोघा गोलंदाजांना टार्गेट करत चेंडूला सीमापार करत राहिला. त्यामुळे शतका नंतर राहूल आपण मोठी खेळी करण्यास उतरलो असल्याचे जणू सुचीत केले. विराट एकेरी धावा घेत राहूलला अधिक चेंडू खेळण्याची संधी देत होता. विराट देखिल चांगल्या लयीमध्ये दिसत होता. दोघा फलंदाजांनी शतकीय भागिदारी देखिल केली. पण, रॉबिन्सनच्या ८४ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाहेरील जाणाऱ्या चेंडूला विराटने छेडले आणि तो स्लिपमध्ये उभा असणाऱ्या जो रुट कडे विराट झेल देऊन बाद झाला. विराटने १०३ चेंडूत ४२ धावा केले. शेवटचे काही षटक शिल्लक असताना विराट बाद झाल्याने भारतासाठी हा मोठा निराशा जनक क्षण होता.

विराट नंतर अजिक्य रहाणे फलंदाजीस आला. या सर्वांमध्ये राहूलने आपली खेळी चालूच ठेवली होती. रहाणेने देखिल त्याचा चांगली साथ दिली. अखेरच्या दोन षटकांमध्ये रहाणे विरुद्ध अपिल देखिल झाल्या. पण अम्पायरनीं गोलदांजाच्या अपीलला फारशी दाद दिली नाही. या सर्वात इंग्लंडला आपला एक रिव्ह्यूव देखिल गमवावा लागला. पण अखेर दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडचा अखेरचा चिवट मार सहन केला व पहिल्या दिवसाचा खेळ ३ बाद २७६ धावांवर संपवला.

खेळ संपला तेव्हा केएल राहूल २४८ चेंडूत १२७ धावांवर नाबाद राहिला तर अजिंक्य रहाणे २२ चेंडूवर १ धाव करुन नाबाद राहिला आहे. उद्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हे दोघे फलंदाज पुन्हा डावाची नव्याने सुरुवात करतील.

इंग्लडच्या गोलंदाजांना सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगलाच घाम गाळावा लागला. पहिल्या विकेटसाठी राहूल आणि रोहित शर्मा यांनी शतकीय भागिदारी केली. तर केएल राहूल आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकीय भागिदारी रचली. त्यामुळे इंग्लडच्या गोलंदाजांनी फारचा प्रभाव टाकता आला नाही. दिवसभरात भारताच्या तीनच विकेट इंग्लडला घेता आल्या. यामध्ये जेम्स ॲडरसन यांने २ फलंदाज बाद केले तर रॉबिन्सन याने १ बळी घेतला. मार्क वूड, सॅम करण मोईन अली यांनी रिकाम्या हातानेच पहिल्या दिवशी परतावे लागले.

Back to top button