

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतींचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळांमध्ये सर्व सोयीसुविधांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळांतील सोयीसुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याने शाळा पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणी गळती, नळ दुरुस्ती, रंगकाम, प्रवेशव्द्ार व कुपणांचे काम, विजेच्या साहित्यांची दुरुस्ती, सर्व वर्गखोल्यांतील दिवे आणि पंखे, खिडक्यांना काचा बसविणे, सीसीटीव्ही कॅमेर्याची दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत.
शिक्षण विभागातर्फे विद्युत विभाग, स्थापत्य विभाग, पाणी पुरवठा विभागास याआधी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शाळांमध्ये दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या उपाययोजना केल्या जात असल्याचे माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
पालिकेच्या शाळांत विविध साहित्य दुरुस्ती तसेच डागडुजीचे काम सुरू आहे.