पंढरपूर बसस्थानकात प्रवाशांची असुरक्षितता | पुढारी

पंढरपूर बसस्थानकात प्रवाशांची असुरक्षितता

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक भेटी देतात. बहुतांश भाविक बसचा आधार घेतात. त्यामुळे नेहमी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. तर याच गर्दीचा फायदा घेऊन बसस्थानकात व बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे विशेषत: महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पर्सच्या चोर्‍या वाढल्या आहेत, तर भाविकांनाही लुटण्याचे प्रमाण येथे वाढले आहे.

चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस व आगार व्यवस्थापन कमी पडत असल्याने चोरट्यांचाच बसस्थानक हे अड्डा बनत असल्याची चर्चा प्रवासीवर्गातून होत आहे. राज्यातील सर्वाधिक मोठे व प्रशस्त बसस्थानक म्हणून पंढरपूरच्या नवीन बसस्थानकाचा नावलौकीक आहे. या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमी गर्दी असते.

दैनंदिन गर्दीसह 15 दिवसांची व महिन्याची एकादशी, वारी या काळात लाखोंच्या संख्येने भाविक येथे ये-जा करत असतात. दिवसभर व रात्रभर या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. मात्र, त्यामानाने येथे प्रवाशांना सुरक्षितता मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. कारण येथे पोलिस मदत केंद्र आहे. मात्र, येथे पोलिस कर्मचारीच येत नाहीत. त्यामुळे बसमध्ये प्रवाशी चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिनेे, पर्स व मौल्यावान वस्तूंची चोरी करतात. असे अनेक प्रकार यापुर्वी घडलेले आहेत.

दोन दिवसापूर्वी येथील नवीन बसस्थानकात एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोट्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील एका वकिलाच्या पत्नीचे डायमंडसह 1 लाख 90 हजार 300 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यांची पर्स चोरुन नेली. याप्रकरणी अ‍ॅड. नामदेव मेटकरी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अ‍ॅड. नामदेव मेटकरी आपल्या कुटुंबासह तीन दिवसांपूर्वी आपल्या मुळगावी मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथे आले होते. दरम्यान पत्नी व मुलांना सासुरवाडीला सोडण्यासाठी पंढरपूर बसस्थानकात आले होते.

दुपारी सव्वा दोन वाजता तुळजापूर – सातारा बसमध्ये पत्नी शीतल व मुले बसली. यादरम्यान गर्दीत बसमध्ये चढताना चोरट्यांनी शीतल यांच्या मोठ्या पर्समधील दागिने ठेवलेली लहान पर्स हातचलाखीने लंपास केली. त्यामध्ये ठेवलेले 48 हजार रूपये किंमतीचे कानातील 12 ग्रॅम सोन्याचे टॉप्स, साखळी, वेल, 14 हजारांची एक अंगठी, 24 हजारांची सोन्याची चेन, 1 हजार 200 रूपयांची चांदीची जोडवी, 600 रूपयांचे चांदीचे कानातील जोड , 1 हजार 500 रूपयांचा मोबाईल चार्जर, 1 हजारांची पर्स आणि 1 लाख रूपये रूपये किंमतीचे रिअल डायमंड पेंडेंट व कानातील एक जोड असा एकूण 1 लाख 90 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

पंढरपूर पोलिस या चोरीचा तपास करत आहेत. या घटनेममुळे पुन्हा एकदा पंढरपूर बसस्थानकाची असुरक्षितता दिसून आली आहे. रात्रीच्या वेळी बसस्थानकातील प्रवाशी भयभीत झालेले असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी तर बसस्थानक सोडून बाहेर पडत नाहीत.अनेक वेळा एखादा प्रवाशी बसस्थानकात झोपला तर त्याचे साहित्य चोरी झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे येथे चोरट्यांचा वाढलेला मुजोरपणा कमी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. याकरीता आगार व्यवस्थापनानेही लक्ष देण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी?

नवीन बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगार व्यवस्थापनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र, या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद होताना दिसत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावले जात आहे. येथे फ्लाटवर सीसीटीव्ही बसवावेत, म्हणजे बसमध्ये प्रवासी चढताना देखील कोणी हातचलाखी केली तर समजू शकेल. मात्र, ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरट्यांवर वचकच बसत नसल्याचे दिसून येते.

Back to top button