पिंपरी : लाचप्रकरणी सहायक फौजदारास अटक; 50 हजारांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

पिंपरी : लाचप्रकरणी सहायक फौजदारास अटक; 50 हजारांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

भावाच्या पत्नीचे पोस्टमार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराने 50 हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याला रंगेहात पकडले. बुधवारी (दि. 25) वाल्हेकरवाडी पोलीस चौकी येथे ही कारवाई करण्यात आली. विठ्ठल अंबाजी शिंगे (वय 57) असे लाच घेतलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला आहे. तसेच, तक्रारदाराच्या भावाच्या पत्नीचे पोस्टमार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली. मात्र, सहायक फौजदार शिंगे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी तडजोड करून 25 हजार रुपये देण्याचे ठरवले.

दरम्यान, तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. तडजोड केलेल्या लाच रकमेतील पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून बुधवारी देण्याचे ठरले. वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत ही लाच देण्यात येणार असल्याने एसीबीने पोलीस चौकीत सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स लाच घेताना शिंगे हा एसीबीच्या जाळ्यात रंगेहात अडकला. एसीबी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करत आहेता

हेही वाचा

Back to top button