नाशिक : शहरातील कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट हटवा, व्यवस्थापन विभागाला आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक : शहरातील कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट हटवा, व्यवस्थापन विभागाला आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले असून, त्या अनुषंगाने आता त्यांनी शहरातील ब्लॅक स्पॉटवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार शहरातील कचर्‍याचे 102 ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी हटविण्याचे आदेश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह आपल्या सहाही विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. आजवर अनेक अधिकारी आणि महापौरांनी ब्लॅक स्पॉट नष्ट करण्याचा निर्धार केला. परंतु, त्यांना यश आलेले नाही.

दरम्यान, आता नवीन पदभार हाती घेतलेल्या आयुक्त पवार यांनीदेखील ब्लॅक स्पॉट हटविण्याचा निर्धार केल्याने त्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागून आहे. ब्लॅक स्पॉट पूर्णपणे हटण्यासाठी महापालिका स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत घेणार असून, ठिकठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्याकरिता मनपाने स्मार्ट सिटी कंपनीला पत्र पाठविले आहे. कॅमेर्‍यांमुळे कचरा टाकण्यास येणार्‍यांचा फोटो कॅमेराबद्ध होऊन त्यांच्यावर कारवाई करणे मनपाला सोपे जाणार आहे. एकूणच केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नाशिक शहराचा क्रमांक पहिल्या पाच शहरांमध्ये येण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी कंबर कसली असून, गेल्या दोन ते तीन वर्षे शहराची होणारी पीछेहाट थांबविण्यासाठी मनपाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत.

‘स्मार्ट’ सहकार्य मिळणार का?
स्मार्ट सिटी कंपनीला दिलेल्या पत्रानंतर आता कंपनी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे. कारण मनपाकडून डिमांड केल्या जाणार्‍या कोणत्याही बाबींचे पालन कंपनीकडून केले जात नाही. साधी सूचनेचीही दखल घेतली जात नसल्याने आधीच कंपनीवर महापालिकेचा रोष आहे. त्यामुळे आता 102 ठिकाणचे ब्लॅक स्पॉट नष्ट करण्याकरिता स्मार्ट सिटी महापालिकेला सहकार्य करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button