पिंपरी : हजारांहून अधिक बैलगाडा घाटात धावणार; पिंपरी-चिंचवडमधील हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव | पुढारी

पिंपरी : हजारांहून अधिक बैलगाडा घाटात धावणार; पिंपरी-चिंचवडमधील हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या तीन तासांत 2 हजारांहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होणार असून, शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 28 ते 31 मे 2022 सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत ही शर्यत होणार आहे. बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकारक केले होते. रामायण मैदानावरील सभागृहात गुरुवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत टोकन स्विकारण्यात आले.

यावेळी बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली. या टोकनचा ‘लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये 2 हजार नावांच्या चिठ्ठया टाकल्या जातात. त्याद्वारे पहिली चिठ्ठी मिळालेला बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले जाते. टोकनची रक्कम घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाते, असे राहुल सस्ते यांनी सांगितले. घाट एकूण 12 सेकंदाचा आहे. त्याआधारे डिजिटल घड्याळाच्या आधारे किती सेकंदात बैलगाडा शर्यत पूर्ण करतो याची नोंद केली जाते.

सुमारे 2 हजार बैलगाडा या घाटात धावणार आहेत. त्यापैकी पहिल्या 120 गाडा मालकांना दुचाकी बक्षीस मिळणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणार्‍या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक अशा बक्षीसांसाठी शर्यत होईल.
लक्षवेधी बक्षिसांमुळे शर्यतीला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी टोकन बुक केले आहे.

महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी नोंदणी केली आहे. टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली असल्याची माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button