प्रथा परंपरा जपण्यासाठी काम करा | पुढारी

प्रथा परंपरा जपण्यासाठी काम करा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्याच्या प्रथा व परंपरेचे जतन करावे, यासाठी पालखी तळ व मार्गावरील त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करावीत. पालखी सोहळ्याबरोबर येणार्‍या वारकरी, भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकरिता सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील पालखी मार्गाची तसेच विविध पालखी तळांची पाहणी शंभरकर यांनी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, बसवराज शिवपुजे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जगदिश निंबाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री. पवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शंभरकर म्हणाले की, यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. पालखी सोहळ्यासोबत येणार्‍या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, अखंडित वीजपुरवठा, शौचालय व्यवस्था, तसेच स्वच्छतेबाबत नियोजन करावे. यासाठी संबधित विभागाने समन्वय साधून कामे तत्काळ पूर्ण करावीत.

पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील संत सोपान महाराज पालखी तळास जागा अपुरी पडत असल्याने पर्यायी जागा म्हणून जलसंपदा विभागाच्या जागेच्या ठिकाणी स्वच्छ पाणी, विद्युत पुरवठा, तात्पुरती शौचालय, स्वच्छता याबाबत नियोजन करुन तात्काळ कार्यवाही करावी.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यात दोन्ही पालखी महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाण पुलांची कामे तत्काळ पूर्ण करावित ज्या ठिकाणी कामे अपुरी असतील त्या ठिकाणी तत्काळ पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

येणार्‍या पालखी सोहळ्यास सुरक्षेबाबत तसेच पालखी मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबत नियोजन करावे. लाखो वारकर्‍यांचा चैतन्यदायी सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
याठिकाणी सुरक्षेच्या द़ृष्टीने आवश्यक नियोजन करावे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणही सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या.

4 व 5 जुलैला पालख्यांचे जिल्ह्यात आगमन

जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 4 जुलै, तर जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 5 जुलै 2022 रोजी होणार आहे. या सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक तसेच दिंड्यांसोबत वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात.

Back to top button