पुणे: परस्पर वाहनात बदल करणार्‍या चार ई-बाईक जप्त : संबंधित डिलरकडून मागविला खुलासा | पुढारी

पुणे: परस्पर वाहनात बदल करणार्‍या चार ई-बाईक जप्त : संबंधित डिलरकडून मागविला खुलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रिक वाहनांत परस्पर बदल केल्यामुळे आरटीओने नॉनरजिस्ट्रेशन 4 ई-बाईक जप्त केल्या आहेत. परिवहन विभागाची परवानगी न घेता वाहनात असा बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे आरटीओने संबंधित डिलरला खुलासा मागविला आहे. बॅटरी क्षमता 250 वॅट आणि वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटर असणार्‍या इलेक्ट्रिक बाईकला आरटीओ कार्यालयात नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली नाही.

मात्र, याच क्षमता असलेल्या बाईकमध्ये डिलर कंपन्या परस्पर बदल करतात. वेगमर्यादा 25 किलोमीटरपेक्षा अधिक ठेवतात. तसेच, बॅटरीची क्षमतादेखील 250 वॅटपेक्षा अधिक ठेवतात आणि गाडीचे आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशनदेखील करीत नाहीत. त्यामुळे आरटीओकडून आता राज्यभरातील ई-बाईकची माहिती हाती घेण्यात आली असून, पुणे आरटीओने कारवाईच्या पहिल्याच दिवशी परस्पर बदल केलेल्या 4 ई-बाईक जप्त केल्या आहेत. तसेच, संबंधित डिलरकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

असा आहे नियम

बॅटरी क्षमता 250 वॅट आणि वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटर असणार्‍या इलेक्ट्रिक बाईकला आरटीओ कार्यालयात नोंदणी बंधनकारक नाही. मात्र, त्यापुढे वेगमर्यादा आणि बॅटरी क्षमता असेल, तर नोंदणी आवश्यक आहे. ई-वाहनांना लागणार्‍या आगीच्या घटनांमुळे परिवहन कार्यालयाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

परस्पर ई-वाहनांत बदल केल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ई-वाहन तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, 4 ई-दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच, वाहनचालक, कंपन्यांनी नॉन रजिस्ट्रेशन ई-बाईकमध्ये कोणतेही परस्पर बदल करू नये; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.

                                          – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

Back to top button