जम्मू; पुढारी वृत्तसंस्था : टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरवादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर काश्मिरात हिंसाचार उसळला आहे. आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर आणि लाठीमार केला. हिंसाचारानंतर खोर्यातील स्थिती तणावपूर्ण असून, अफवा पसरवू नयेत, यासाठी प्रशासनाने अनेक भागांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. अनेक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरमधील मैयसुमा परिसरात यासीन मलिकचे घर आहे. त्या ठिकाणी त्याचे अनेक समर्थक राहतात. मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. काश्मिरातील अनेक भागांत कडकडीत बंद होता. जम्मू-काश्मीरचे पोलिस आणि सुरक्षा दलांचे विशेष नाके स्थापन करण्यात आले असून, सतर्कता बाळगली जात आहे. दुसरीकडे, यासीनला शिक्षा झाल्यानंतर श्रीनगर शहरात काही प्रमाणात बंद पाळण्यात आला.
शहरातील काही दुकाने आणि उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. काश्मिरात सुरक्षा दलांनी गस्त वाढवली आहे.लोकांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागात संशयितांची तपासणी केली जात असून, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार भडकला जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी सुरक्षा दलांचे जवान सातत्याने गस्त घालत आहेत. खोर्यातील संवेदनशील भागातील सुरक्षा वाढविण्याचे आणि बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी गस्त घालण्याचे आदेश पोलिस अधिकार्यांनी दिले आहेत.