

पुणे : पुढारी वृत्तसेवा
किडनी रॅकेट प्रकरणात नव्याने आणखी तीन रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. पुणे, ठाणे व कोईम्बतूर येथील रुग्णालये सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिक तपासासाठी अटक एजंटांना एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
बनावट नातेवाईक व कागदपत्राद्वारे एजंटच्या मार्फत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले, तशाच प्रकारे या तीन रुग्णालयांतदेखील किडनी प्रत्यारोपण झाल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. किडनी तस्करीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत असताना आता हा तपास कोरेगाव पार्क पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या दोघा एजंटांना अटक केली आहे. गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केल्यानंतर पुण्यासह कोइम्बतूर व ठाणे येथील रुग्णालयांचा सहभाग समोर आला आहे. एजंटांकडून गुन्ह्यातील मिळालेली काही रोकड जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. या तीन रुग्णालयांत बनावट नातेवाईक व कागदपत्रे दाखवून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
https://youtu.be/m5yyfqkYqY4