मुंबई ते पुणे अवघ्या दीड तासांत! | पुढारी

मुंबई ते पुणे अवघ्या दीड तासांत!

मुंबई; पुढारी डेस्क : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने जवळ आणलेले मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार आहे. आणखी दोन ते अडीच वर्षांतच, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजे शिवडी ते न्हावा शेवा सागरी पूल पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 90 मिनिटांत कापता येईल. त्याचप्रमाणे गोव्याकडे जाणार्‍या प्रवाशांनाही दिलासा मिळेल. ट्रान्स-हार्बर लिंकमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या बर्‍यापैकी सुटेल तसेच नवी मुंबईच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विस्तारित मार्ग

एमटीएचएल सुरू झाल्यावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे कोंडी होण्याची शक्यता होती. न्हावा शेवा भागातून बाहेर जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे ट्रान्स-हार्बर लिंकवरून बाहेर पडणार्‍या वाहनांना दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागला असता. वर्दळीच्या वेळेत या प्रवासाला 45 मिनिटे लागली असती. यावर उपाययोजना म्हणून एमटीएचएलला 6 किलोमीटरचा विस्तारित मार्ग बांधण्याचे नियोजन आहे.

सध्याचा मार्ग

पी. डि’मेलो मार्ग, फ्रीवे, सायन-पनवेल एक्स्प्रेसवे, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे. (गोव्याकडे) एनएच 48, एनएच 748

भविष्यातील मार्ग

पी. डि’मेलो मार्ग, फ्रीवे (शिवडीपूर्वी एक्झिट), एमटीएचएल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून चिर्लेमार्गे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (गोव्याकडे) एनएच 48, एनएच 748

प्रवासवेळेला कात्री

मुंबई-पुणे, या मार्गावरील लोणावळा व खंडाळा तसेच एनएच 48 वरील अन्य ठिकाणांच्या प्रवासाची वेळ 90 मिनिटांनी कमी होणार.

Back to top button