पुण्यातील दहा वर्षांपूर्वीच्या पुलांचेही होणार ऑडिट; 1 कोटी 30 लाख खर्चास मंजुरी | पुढारी

पुण्यातील दहा वर्षांपूर्वीच्या पुलांचेही होणार ऑडिट; 1 कोटी 30 लाख खर्चास मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या झालेल्या सर्व उड्डाणपुलांचे आणि नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेकडून करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी या कामासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. त्यानुसार तातडीने ही कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडून देण्यात आली.

शहरात रस्त्यावर 18 उड्डाणपूल, 17 नदीवरील पूल आणि रेल्वेलाइनवरील 9 पूल आहेत. यामधील अनेक पूल ब्रिटिशकालीन आहेत, तर महापालिकेने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल बांधलेले आहेत. महापालिकेकडून या पुलांचे प्रत्येक पाच वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यात ज्या पुलांना धोका असतो अशा पुलांची तातडीने दुरुस्ती केली जाते.

त्यातच काही दिवसांपूर्वीच हडपसर येथील उड्डाणपुलाच्या बेअरिंग तुटल्यामुळे महिनाभर हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. आता पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने दहा वर्षांपेक्षा जुन्या तसेच जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा समावेश असल्याची माहिती वाहतूक नियोजन विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा

Back to top button