चंद्रपूर : वाघाचा दाम्‍पत्‍यावर हल्‍ला ; पती गंभीर अवस्थेत सापडला | पुढारी

चंद्रपूर : वाघाचा दाम्‍पत्‍यावर हल्‍ला ; पती गंभीर अवस्थेत सापडला

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

चिमूर तालुक्यातील केवाडा येथील दाम्‍पत्‍यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला हाेता. यामध्‍ये पत्नी ठार झाली हाेती. तर पती या हल्‍यानंतर बेपत्ता हाेता. आज सकाळी ताे घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर गंभीर जखमी अवस्‍थेत आढळला. त्याला चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

वाघाच्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती. मीना विकास जांभूळकर (वय ४५) असे त्‍यांचे नाव आहे. हल्‍ल्‍यानंतर त्‍यांचे पती  विकास जांभुळकर (वय ५५) हे बेपत्ता हाेते.

केवाडा येथील विकास जांभूळकर हे पत्नी मीनासह गावातील काही लाेकांसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. या वेळी सगळे लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी विखूरले गेले. पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने जांभूळकर दाम्पत्य एकमेकासोबत राहून पाने तोडत होते. यावेळी जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने या दाम्पत्यावर हल्ला केला. यामध्‍ये  पती-पत्नीचा यामध्ये मृत्यू झाल्याचा संशय व्‍यक्‍त हाेत हाेता.

पती-पत्नी दोघेही साडेदहा वाजेपर्यंत तेंदूपत्ता तोडून घरी यायचे. परंतु काल साडेअकरा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे काही ग्रामस्थांनी जंगलात शोध घेतला. पत्नीचा मृतदेह आढळून आला. तर घटनास्थळापासून ५० मीटरवर पतीचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला . त्यामुळे पत्नी पाठोपाठ पतीही वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचा संशय बळावला हाेता. अखेर वनविभाग व पिआरटी चमू व काही नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली; परंतु विकास यांचा शोध सायंकाळपर्यंत लागला नाही. अखेर सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने शोधमोहीम थांबवून पत्नीचा मृतदेह चिमूर उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला होता.

आज बुधवारी पुन्हा शनेरी वनविभागाचे क्षेत्रसहायक रासेकर, वनरक्षक नागरे , पिआरटी चमू व स्थानिक नागरिकांनी लाठ्याकाठ्या घेऊन के़वाडा जंगलात सकाळपासून शोधमोहीम राबविली. काल घडलेल्या घटनास्थळापासून तब्बल दीड किमी अंतरावर डोंगराळ परिसरात पिआरटी चमूचे विनोद चौधरी व सतीश बावणे यांना विकास हे गंभीर जखमी व बेशुध्दावस्थेत आढळून आले.  त्‍यांच्‍या डोक्यावर वाघाने पंजाचा वार केला आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button