पुणे: लष्कर ए तैयबाच्या संपर्कातील पुण्यातील तरुणाला एटीएसकडून बेड्या | पुढारी

पुणे: लष्कर ए तैयबाच्या संपर्कातील पुण्यातील तरुणाला एटीएसकडून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा
भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी, जातीय सलोखा धोक्यात आणण्यासाठी तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुण्यातील तरुणाला बंदी असलेल्या लष्कर ए तैयबा (एलईटी) या संघटनेत भरती केल्याचा धक्कादायक प्रकार दहशत वाद विरोधी पथकाने (एटीएस) उघड केला. त्या तरुणाला एटीएसने पुण्यातील दापोडी परिसरातून बेड्या ठोकल्या आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोहम्मद जुनैद मोहम्मद अता (वय 24, रा. दापोडी) याला अटक करण्यात आली.लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. जुनैद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याच्या तीन साथीदारांचा एटीएस शोध घेत आहे. या प्रकरणात तिघे फरार असून तिघेही मुळचे जम्मू काश्मीर येथील आहे. तिघेही लष्कर ए तोयबाशी संबधीत असल्याची सूत्रांनी सांगितले. 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान फरार असलेल्या जुनेदचा साथीदार याने एक अन्सर गझवात हिंद/तवाहीद नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होतो.

त्या ग्रुपच्या माध्यमातून देश विरोधी पोस्ट व दहशादासंबंधी पोस्ट टाकून ग्रुप मधील इतर सदस्यांना उत्तेजित केले जात होते. त्याच ग्रुपमध्ये जुनैद हा देखील सहभागी असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात समोर आले. दोन फरार असलेले जम्मू काश्मीर येथील आरोपी यांच्या तो संपर्कात होता. त्याच्या बँक खात्यावर त्यांनी पैसे देखील पाठवले होते. तसेच त्याने वापरत असलेल्या मोबाईलद्वारे विविध सिमकार्ड वापरून फेसबुकवर वेगवेगळ्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याचे दोन साथीदारांनी मिळून लष्कर ए तैयबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेत भरती करण्यासाठी व त्यांना दारूगोळा व शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देऊ, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विविध गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा येईल असे घातपाती व दहशतवादी कृत्य घडवून भारतातील धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोखा धोक्यात आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान जुनैदला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. बचाव पक्षाचे वकील यशपाल पुरोहित यांनी विधिसेवा प्राधिकरणामार्फत जुनैदच्या बाजूने युक्तिवाद केला.

कोल्हापूर : आजर्‍याजवळ पुन्हा टस्कर; ग्रामस्थांत घबराट

भारतात महत्त्वाच्या स्थळांची रेकी झाल्याचा एटीएसला संशय….

जुनैद याने लष्कर ए तैयबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेकरिता नवीन सदस्याची भरती करण्याकरिता आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशा अवैध कृत्य करीत असून जुनैद मार्फत त्यांचे मॉड्युल बाबत माहिती आता एटीएसला घ्यायची आहे. जुनैदने कोणाला प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले होते का ? याचाही शोध घ्यायचा आहे. जुनैद आणि त्याचे साथीदार भारतातील गर्दीच्या ठिकाणी घातपात व दहशतवादी कृत्य घडवून आणणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करायचा आहे.

त्याने भारतातील मर्मस्थळांची, संरक्षण दल तसेच देशातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली असण्याची शक्यता आहे. जुनैद आणि त्याच्या साथीदारांनी भारतामध्ये घातपात व दहशतवादी कृत्य करण्यासाठी शस्त्रास्त्र साठा, दारूगोळा पाठविला आहे का ? याचा तपास करायचा आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा किंवा माध्यमांचा वापर केला याचा देखील तपास करायचा आहे. फरार आरोपींना देखील अटक करायची आहे. जुनैदचा भारतातील इतर राज्यातील व्यक्तीशी देखील संपर्क झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असल्याने त्याचा देखील तपास करायचा एटीएसला करायचा आहे.

जेजुरी: जागेअभावी उद्योगवाढीचा विस्तार थांबला; एकही वाहननिर्मिती उद्योग नाही

 

अशी झाली न्यायालयात सुनावणी

त्याला एटीएसने मंगळवारी (दि.24) दुपारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले. सुरवातीला त्याला दीड वाजण्याच्या सुमारास त्याला हजर करण्यात येणार होते. परंतु, न्यायालयाने त्याला दुपारी तीन वाजता हजर करण्यास सांगितले. त्याला दुपारी तीन वाजता काळा बुरखा घालून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का अशी विचारणा केली, परंतु त्याने कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी युक्तिवादाला सुरवात करताना जुनैदच्या खात्यावर लष्कर ए तोयबा या संघटनेकडून दोन वेळा पाच-पाच हजार रुपये आल्याचे व त्याने ते काढून घेतल्याचे सांगितले. मात्र, जुनैदच्या वतीने कोणीही वकील नसल्याने न्यायालयाने विधिसेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील घेण्यास सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पंधरा मिनिटे बाहेर पाठवले. याच दरम्यान विधिसेवा प्राधिकरणाकडून त्याच्यावतीने यशपाल पुरोहित हे हजर झाले. अ‍ॅड. फरगडे यांनी त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

सांगली : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून

 

जिहादच्या नावाखाली त्यांनी माझे ब्रेनवॉश केले- जुनेदची न्यायालयात माहिती

विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने जुनेदचे वकील यशपाल पुरोहित न्यायालयात हजर झाल्यानंतर जुनेदने न्यायालयात आपले म्हणणे मांडले. त्याने हिंदीमध्ये न्यायालयाला सांगितले की माझे इतर दोन आरोपींनी जिहादच्या नावाखाली बे्रन वॉश केले आहे. त्यावर न्यायालयाने त्याला पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास सांगताना त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

  • जम्मू-काश्मीरच्या दहशतवाद्यांच्या होता संपर्कात
  • देशातील विविध स्थळाची रेकी केल्याचाही संशय
  • संघटनेच्या भरतीसाठी केली वेगवेगळी फेसबुक अकाऊंट तयार
  •  धार्मिक तेढ निर्माण केल्याचाही संशय
  • गर्दीच्या ठिकाणी घातपाताच्या कारवाया करण्यासंबंधी सुरू होते काम
  • आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एलईटी भरती
  • 3 जूनपर्यंत विशेष न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
  • जिहादच्या नावाखाली त्याचे ब्रेनवॉश ?

 

Back to top button