राजेंद्र गलांडे
बारामती : प्रचंड वेगाने विकसित होणार्या बारामती परिसरात जमीन खरेदीपोटी होणार्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या भागात जमिनींना अवाच्या सवा भाव आलेले आहेत. गुंतवणुकीसाठी नोकरदार वर्ग बारामती व परिसराला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे. त्यातून इस्टेट एजंटांचे फावत असून, खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कोट्यवधींच्या फसवणुका होऊ लागल्या आहेत.
बारामतीत उपलब्ध असणार्या शिक्षणाच्या संधी, औद्योगिकीकरण, राष्ट्रीय पातळीवरील आलेले अनेक प्रकल्प, यामुळे शहर व तालुका वेगाने विकसित होत आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवणपर्यंतचा भाग बारामतीला तसा अत्यंत जवळचा ठरतो आहे. इंदापूर तालुक्यातील अर्ध्या भागाचा रोजचा बारामतीशी संबंध येतो. त्यांना तालुक्याच्या गावाऐवजी बारामती जवळ पडते. त्यामुळे बारामतीबरोबरच लगतच्या इंदापूर तालुक्यातील गावांमधील शेतजमिनींचे दर प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी बारामतीला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. नोकरदारांसह अन्य व्यावसायिक, उद्योजक यापासून ते सर्वसामान्यालाही बारामती परिसरात आपली एखादा गुंठा जागा असावी, असे वाटते. त्यात काही गैर नाही.
त्यातूनच बारामती परिसरात लचके तोडल्याप्रमाणे जमिनींचे हिस्से पाडून गुंठेवारीने बाळसे धरले. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत गुंठेवारीने प्रचंड वेग धारण केला. अनेक अल्पशिक्षितांनीही मग यात उडी टाकली. सुरुवातीला कमिशन तत्त्वावर ते काम करू लागले. नंतर त्यातून बक्कळ पैसा मिळू लागल्यावर त्यांनी स्वतःच जमिनी घेत प्लॉटिंग सुरू केले. उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय करण्यात काहीही गैर नाही. परंतु, त्यातून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले.
अशा व्यवहारांमध्ये फसणूक होऊ नये, यासाठी खरेदीखत करून घेण्यापूर्वीच संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. दलाल व्यक्तीने दाखविलेले जमिनीचे मूळ मालक तेच असल्याची चौकशी करून खात्री करायला हवी. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यापूर्वी वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्राबाबत कोणाची काही हरकत असल्यास ते समजू शकते. परंतु, अनेक व्यवहारांमध्ये नोटीस प्रसिद्धीला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे गुपचुप होणार्या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते.
https://youtu.be/3Jp5K4rDdco