

पुणे : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे तसेच करिअर करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम उपलब्ध असणार्या राज्यातील नामवंत शैक्षणिक संस्थांची ओळख व्हावी, यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'पुढारी' एज्यु-दिशा ऑनलाईन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे.
त्याला राज्यातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. लोकाग्रहास्तव एक दिवस कालावधी वाढविलेल्या या प्रदर्शनाचा आज मंगळवारी (दि. 10) प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाने समारोप होणार आहे.
दहावी-बारावीनंतर नेमके कोणते करिअर निवडायचे आणि त्यासाठी मार्गदर्शन कोण करणार, या संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी 'पुढारी' एज्यु-दिशा ऑनलाईन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार दि. 7 ते 10 ऑगस्टदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे.
कोरोनाचे निर्बंध अद्याप शिथिल झाले नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना घराबाहेर पडणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शैक्षणिक भवितव्याबाबत अस्वस्थ झाले आहेत.
अशा परिस्थितीत एज्यु-दिशा प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या कोणतेही शुल्क न खर्च करता राज्यातील नामवंत शैक्षणिक संस्थांची ओळख तर झालीच.
त्याचबरोबर विविध तज्ज्ञांकडून करिअरनिश्चितीचा मार्गदेखील सापडला.
प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी लेखक अरविंद जगताप यांनी 'कलेमधून पैसे मिळतात का', डॉ. दिलीप सातभाई यांनी 'कॉमर्समधील करिअरच्या संधी', तर दिलीप ओक यांनी 'परदेशातील शिक्षणाच्या संधी' या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर आज शेवटच्या दिवशी प्रख्यात लेखक व आय.टी.तज्ज्ञ अच्युत गोडबोले हे 'उद्याचे तंत्रज्ञान' आणि शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे 'नॅनो टेक्नॉलॉजी ः नव्या युगाचे तंत्रज्ञान' या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, तर सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत.
प्रदर्शनाच्या माध्यमातून शैक्षणिक करिअरचा महत्त्वाचा प्रश्न सुटत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी प्रदर्शनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती.
त्यांच्या आग्रहास्तव एक दिवस कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभागी होत आपल्या करिअरचा मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे.
प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत. www.pudhariexpo.com या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे.
यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल, असे दोन पर्याय असतील. यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील.
त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल. त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.
प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज प्रदर्शनाचा समारोप
हजारो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि नामवंत शैक्षणिक संस्थांची झाली ओळख
लॉ अँड ऑर्डरचे जॉईंट सी. पी. विश्वास नांगरे-पाटील, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, डीन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे शीतलकुमार रवंदळे, आयटी प्रोफेशनल दीपक शिकारपूर, माजी सनदी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख, इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर, लेखक अरविंद जगताप, डॉ. दिलीप सातभाई, दिलीप ओक यांनी वेगवेगळ्या विषयांवर 'पुढारी' एज्यु-दिशा ऑनलाईन वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव 'पुढारी' एज्यु-दिशा ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होता आले नाही अशा विद्यार्थ्यांना यूट्यूब चॅनेलवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने पाहून आपल्या करिअरचा मार्ग निवडता येणार आहे.
एज्यु-दिशा व्याख्यानांचे वेळापत्रक
क्र. व्याख्याते विषय तारीख वेळ
1 अच्युत गोडबोले (प्रख्यात लेखक व आय.टी. तज्ज्ञ) उद्याचे तंत्रज्ञान 10 ऑगस्ट स. 11.00 वा.
2 डॉ. पी. एस. पाटील (प्र. कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ) नॅनो टेक्नॉलॉजी : नव्या युगाचे तंत्रज्ञान 10 ऑगस्ट दु. 1.00 वा.