नवाब मलिक म्हणाले पालिका निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होणार | पुढारी

नवाब मलिक म्हणाले पालिका निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी काही परिस्थिती नाही. स्थानिक पातळीवर आघाडी झाली नाहीतर महाविकास आघाडीतील पक्षही स्वतंत्र निवडणूक लढवतील, अशी राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षांची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

काँग्रेसने येणार्‍या महापालिका आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नार्‍यानंतर महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही शक्य असेल तेथेच आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे.

भाजपवर हल्‍लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले होते, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानेही सणासुदीला गर्दी करू नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे असे निर्देश दिले होते. असे असताना भाजपचे आमदार मात्र वेगळीच वक्तव्ये करत आहेत.

हे सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल तर मग नरेंद्र मोदी बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्ला नवाब मलिक यांनी चढवला.

जो सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल त्यांचे लोक किती ऐकतील, असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

मोदी सरकारमधील मंत्री फक्त बोलण्यासाठीच

मोदी मंत्रीमंडळातील मंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

15 ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आला नाही अशी टिप्पणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी हा टोला लगावला.

Back to top button