

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढत आहे. विशेषत: पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा व माढा या पाच तालुक्यांत 13 ऑगस्टपासून (शुक्रवार) पुन्हा कडक निर्बंध लादण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनमध्ये या तालुक्यांत अत्यावश्यक सेवा चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील शहर वगळता ग्रामीण भागातील काही तालुक्यांत सातत्याने कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत चालले आहेत. विशेषत: पाच तालुक्यांतच हे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून शंभरकर यांनी शुक्रवारपासून पाच तालुक्यांतील कोरोना निर्बंध कडक करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये त्या तालुक्यांत अत्यावश्यक सेवेतील दुकाने रुग्णालये आणि मेडिकल ही सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंतच चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. इतर सेवांची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत.
थिएटर, मॉल, सिनेमागृह, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सण, उत्सव, जीन, ब्युटीपार्लर, सलून दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पाच तालुक्यांतील शासकीय कार्यालये केवळ 50 टक्क्यांच्या क्षमतेने चालविण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगी कार्यालये ज्यांना सूट देण्यात आली आहे ती कार्यालये दुपारी 4 पर्यंत चालू ठेवता येतील. इतर दुकाने मात्र बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मेळावे, मनोरंजन, राजकीय कार्यक्रम यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यासह अंत्यविधीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. वाहतुकही 50 टक्क्यांच्या क्षमतेचीच परवानगी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकांना 50 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत मुभा देण्यात आली आहे. या पाच तालुक्यांत असणार्या बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेतच सुरू राहणार आहेत. याकालावधीत त्या तालुक्यांत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांत मात्र निर्बंध पूर्वीप्रमाणेच 'जैसे थे' आहेत. येथे सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत अत्यावश्यक सेवांसह सर्वच सेवा सुरू राहणार आहेत. तेथे अत्यावश्यक सेवांना 24 तास मुभा आहे.
पंढरपुरात दि. 13 पासून कडक संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर होताच राष्ट्रवादीही विरोधात मैदानात उतरली आहे. त्यांनी प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा व एकतर्फी असल्याचा आरोप करीत संचारबंदी पाळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोप करीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली.
याअगोदर आषाढी यात्रेतही कडक संचारबंदी होती. त्यामुळे लोकांना खायलासुद्धा मिळणे अवघड झाले आहे. जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. तरीही पुन्हा कडक संचारबंदी जाहीर केली आहे. हा प्रशासनाचा निर्णय योग्य नाही. तो निर्णय रद्द करावा, अशी आग्रही भूमिका घेतली आहे.