शस्त्र म्हणून वापरता येण्यासारख्या कृत्रिम हिर्‍याची निर्मिती | पुढारी

शस्त्र म्हणून वापरता येण्यासारख्या कृत्रिम हिर्‍याची निर्मिती

बीजिंग : चीन वैज्ञानिकांनी एक असे ‘ग्लास मटेरियल’ म्हणजेच काचेची वस्तू तयार केली आहे जी एखाद्या हिर्‍यासारखी कठीण आहे. या कृत्रिम हिर्‍याला ‘एम-3’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचा उपयोग हायटेक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच एक शस्त्र म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो.

‘एम-3’ एक अर्धवाहक (सेमीकंडक्टर) पदार्थ आहे. त्यामधून विजेचा प्रवाह जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच कार्बनपासून बनवलेल्या या ‘एम-3’ चा वापर बुलेटप्रूफ विंडो बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. हा पदार्थ सेमीकंडक्टर सिलिकॉनइतकाच उपयुक्त आहे. हा पदार्थ फोटोइलेक्ट्रिक डिव्हाईस म्हणून वापरता येण्यासारखा तसेच अधिक तापमान झेलण्याची क्षमता असलेला आहे.

त्यामुळेच त्याचा वापर अद्ययावत शस्त्र बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. अशा अल्ट्रास्ट्राँग सेमीकंडक्टर डिव्हाईसचे अनेक उपयोग आहेत. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठावा लागेल. उत्तर चीनमधील वैज्ञानिकांनी या पदार्थाची निर्मिती केली आहे.

हा पदार्थ अगदी खर्‍या हिर्‍यामध्येही ओरखडा निर्माण करू शकतो असे म्हटले जाते. त्याची बुलेटप्रूफ क्वॉलिटी ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अशा सामग्रीच्या तुलनेत वीस ते शंभर पटीने अधिक चांगली असू शकते, असेही म्हटले जाते. या पारदर्शक ‘एम-3’ पदार्थाला अनेक आकार व रूपात बनवले जाऊ शकते.

Back to top button