पोपट, कासव घरात ठेवणे पडेल महागात | पुढारी

पोपट, कासव घरात ठेवणे पडेल महागात

 पुणे : पुढारी वृत्तसेवा
आपण घरात सहजपणे पोपट, कासव पाळत असाल तर सावधान! कारण भारतीय वन्यजीव कायदा 1972 प्रमाणे तुम्हाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. या कायद्याप्रमाणे पक्षी घरात पाळणे गुन्हा असल्याचे मत पक्षितज्ज्ञांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी शहरात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी एका पक्षी तस्कराला अटक करून 123 पक्ष्यांची सुटका केली. त्याने एकाच पिंजर्‍यात हे सर्व पक्षी डांबल्याने एका सजग नागरिकाच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. त्यात दोन पहाडी पोपटांसह लव्ह बर्डचा समावेश होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा पक्षी पाळण्याबाबतचा मुद्दा चर्चेत आला. याबाबत पक्षितज्ज्ञांशी चर्चा केली असता असे लक्षात आले की, एकही भारतीय पक्षी आपल्याला घरात पाळण्यास परवानगी नाही. जे लोक घरात पोपट पाळत असतील तर तो वन्यजीव कायदा 1972 नुसार गुन्हा आहे. यात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. मात्र सामान्य नागरिकांना याची माहिती नसते.

फक्त लव्ह बर्डला परवानगी..

रंगीबेरंगी छोटे पक्षी बाजारात पिंजर्‍यात विक्रीसाठी दिसतात त्यांना लव्ह बर्ड म्हणतात. ही जात ऑस्ट्रेलियातून भारतात आलेली आहे. तिकडे हे पक्षी पाळण्यास बंदी असली तरी भारतात मात्र परवानगी आहे. मात्र एकही भारतीय पक्षी पाळण्यास परवानगी नाही. त्यासाठी विविध शेड्युल तयार केले असून त्याप्रमाणे परवानगी घ्यावी लागते. अन्यथा तो गुन्हा ठरतो.

एका पिंजर्‍यात किती पक्षी ठेवावेत याबाबत नियमावली आहे. त्याचा आकारही ठरवून दिलेला आहे. मात्र जास्त पक्षी एकत्र ठेवले तर त्यांच्या मलमूत्र विसर्जनामुळे विविध प्रकारचे बुरशीजन्य आजार होऊ शकतात. बर्डफ्लू हा त्यापैकीच एक आजार आहे. याबाबत सायटीस नावाचा कायदा आहे. तसेच केंद्र सरकारच्या सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीच्या नियमावलीचा स्वतंत्र कायदा आहे. याची नियमालवली इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यानुसार पक्षी पाळताना काळजी घेतली पाहिजे.
-डॉ. सतीश पांडे, पक्षितज्ज्ञ

हेही वाचा :

Back to top button