शरद पवार साधणार ब्राह्मण संघटनांशी संवाद | पुढारी

शरद पवार साधणार ब्राह्मण संघटनांशी संवाद

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी 5 वा. राज्यातील विविध ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत.

बैठकीसंदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली आहे. राज्यात सध्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. यातून समाजातील घटक अस्वस्थ होत आहेत. या परिस्थितीवर संवादातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला विरोध करणारे संघटनांचे पदाधिकारी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने ते शरद पवार यांच्या समोर बसण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते बैठक रद्द झाल्याचीही अफवा पसरवत आहेत. मात्र, बैठक निश्चित होणार असल्याचे गारटकर यांनी स्पष्ट केले.

बैठकीवर बहिष्कार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली. तसेच दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वारंवार टीका होत आहे. अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यभर दाखल झालेले गुन्हे, समाज माध्यमावर होणारी टीका यावरून ब्राह्मण समाजात नाराजी आहे. त्यामुळे पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीवर बहिष्कार टाकत असल्याचे परशुराम सेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे तसेच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले आहे.

Back to top button