पुणेकरांना दिलासा, दुकाने रात्री आठपर्यंत सुरु राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

पुणेकरांना दिलासा, दुकाने रात्री आठपर्यंत सुरु राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लॉकडाऊन संदर्भातील निर्बंध आणखी शिथिल करत पुणे आणि पिंपरी चिंचवडला मोठा दिलासा दिला. येथील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच मॉल्सना रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवागनी दिली आहे, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अजित पवार म्‍हणाले की,  पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्यातील एक दिवस बंद ठेवून रात्री आठपर्यंत दुकाने उघडी राहतील. दुकान मालकांनी, सेल्समन यांनी मास्क घालणे, दोन्ही लस घेणे बंधनकारक आहे.

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल सुरू करण्यास परवानगी आहे मात्र ग्राहक व स्टाफ यांनी दोन डोस घेतले पाहिजे, रात्री 8 पर्यंत सुरू राहतील, 15 दिवसांनी स्टाफची टेस्ट करणे आवश्‍यक आहे. उद्याने नियमितपणे सुरू राहतील, मास्क वापरणे बंधनकारक असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. काेराेना संसर्गाचा पुणे येथील टक्‍का 3.3 आहे तर पिंपरी 3.5 टक्के बाधित दर असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण मध्ये दुपारी चारपर्यंत आस्थापना सुरू राहतील

पुणे ग्रामीण मध्ये दुपारी चार पर्यंत आस्थापना सुरू राहतील. हॉटेल दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील.- शहरातील 7 टक्क्यांपेक्षा पुढे बाधित दर गेला तर हा निर्णय तात्काळ थांबवण्यात येईल. सर्वांनी कोविडचे नियम पाळले पाहिजेत, असेही अजित पवार म्‍हणाले.

जिल्ह्यासाठी सोमवारी पासून लेव्हल 3 चे नियम लागू असणार आहेत. पुणे शहर व पिंपरी चिंचवड साठी निर्णय घेण्यासाठी आग्रही होते काही लोकप्रतिनिधी पण 5.5 टक्के सरासरी बाधित दर आहे त्यामुळे शहरासारखा निर्णय घेण्यात आला नाही.
सगळ्यांना आवाहन करायचं आहे की शासन पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही. महविकास आघाडी सरकार आल्यानंतर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतले, त्यामध्ये कोणी राजकारण करू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

पुणे जिल्ह्यात 65 लाख जणांनाचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. जँबो हॉस्पिटलचे ऑडिट केलं आहे, ते पुढील 6 महिने वापरता येईल. केरळमध्ये तिसरी लाट सुरू झाल्याचे दिसतेय. आपल्या राज्यात काही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून येत नाही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन बाहेरून आणावा लागणार नाही म्हणून येथेच प्लांट सुरू करण्यात येत आहेत.

हेही वाचलं काय?  

 

Back to top button