नागठाणेत पूरग्रस्त तरुण शेतकर्याची आत्महत्या
वाळवा/भिलवडी : पुढारी वृत्तसेवा
महापुरात झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे नागठाणे (ता. पलूस) येथील नीलेश बाळकृष्ण पवार (वय 22) या तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरात नीलेशच्या शेतीचे व जनावरांच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे नीलेश हा नैराश्यात होता. बुधवारी तोगोठ्यातील साफसफाईसाठी गेला होता. मात्र, तो घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. काही वेळाने नीलेशने याच शेडमध्ये गळफास लावून घेतल्याचे निदर्शनासआले. याप्रकरणी त्याचे वडील बाळकृष्ण दशरथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.
नीलेशचे एकत्र कुटुंब आहे. त्याच्या घरात आई, वडील, लहान भाऊ, बहीण, चुलते व त्यांचे कुटुंब असे एकून दहाजणरहात होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एक एकर शेतीवर घराचा उदरनिर्वाह चालत आहे. लॉकडाऊनच्या काळात फिरून भाजीपाला विकण्याचे काम निलेशचे वडील करीत होते. जनावरे व शेतीच्या आधारावर हे कुटुंब पोट भरत होते.
महापुरामुळे या शेतकरी कुटुंबावर जणू आकाशच कोसळले. त्यांच्या शेतातील उसाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून अद्याप काही मदत मिळालेली नाही. निलेश हा सकाळी शेताकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडला. शेतीची अवस्था पाहून त्याला प्रचंड निराश झाला. यातूनच जनावरांच्या गोठ्यात गळफास घेवून निलेशने आपली जीवनत्रा संपवली. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. निलेशच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पांगे हे करीत आहेत.

