हिंगोली : जप्त जेसीबी सोडवण्यासाठी तोतया दलालाने ३ लाखांला गंडविले | पुढारी

हिंगोली : जप्त जेसीबी सोडवण्यासाठी तोतया दलालाने ३ लाखांला गंडविले

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तहसीलकडे जप्त जेसीबी सोडवण्यासाठी तहसीलदाराशी वशीला असल्याचे भासवत आणि तुमचा दंड कमी करून सोडवून देतो म्हणून एका दलालाने जेसीबी मालकाची ३ लाख ८० हजाराची फसवणूक केली आहे. या घटनेतील दलालावर गुन्हा दाखल झाल्याने कळमनुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर मुंजाजी मस्के यांच्या मालकीचा जेसीबी १२ मे रोजी तालुक्यातील कोंढूर शेत शिवारात गायरानमधील माती उपसत होता. यानंतर कळमनुरी तहसीलदार मयूर खेंगले यांनी बेकायदेशीर उपसा करत असल्याचे सांगत जेसीबी जप्त करीत आ. बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांना ७ लाख ८० हजार रक्कम दंड म्हणून नोटीस देण्यात आली होती. जेसीबी सोडवण्यासाठी तहसील कार्यालयात प्रभाकर मस्के वारंवार येजा करत होते.

याच दरम्यान प्रभाकरला तोतया दलाल नितीन पतंगे (रा. रेणापूर) यांची भेट झाली. नितीन पतंगे याने तहसीलदारपर्यंत आपला वशिला असल्याचे भासवत तुमच्यावर लावलेले दंड कमी करून जेसीबी सोडवून देतो असे सांगितले. नितीन याने प्रभाकरचा विश्वास संपादन करत ३ लाख ८० हजारापर्यत जेसीबी सोडवून देण्याचे कबूल केले. प्रभाकरने टप्प्या- टप्प्याने ३ लाख ८० हजारांची रक्कम नितीनला दिली.

यानंतर १५ जुनला तहसीलदार यांच्या नावाने भविष्यात गुन्हा होणार नाही खुलासा सादर करावा अशी कागदपत्रे मिळाल्यावर जेसीबी सोडण्यात येईल असे बनावट आदेश नितीनने प्रभाकरला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला. तसेच आपले काम झाले असून बाळापूर पोलिस स्टेशनला यावे असा संदेश दिला. परंतु, यानंतर त्यांने साहेब कामात असल्याने येऊ शकणार नाहीत असे सांगत हुलकावणी दिली. वारंवार या घटनेची विचारफूस करून देखील जेसीबी प्रभाकरला मिळाला नाही.

प्रभाकरने सदर आदेशबाबत तहसील कार्यलयाशी माहिती घेतली असता सदर आदेश बोगस असल्याचे उघडकीस आले. यानंतर प्रभाकरने नितीनकडे दिलेल्या रक्कमेची मागणी केली. नितीनने त्यांना ५ लाखांचा चेक देवून शिल्लक रक्कम मला आणून द्या असे संगितले. पंरतु, सदर चेक हिंगोली शाखेत वटला नाही. यावेळी खात्यावर रक्कम नसल्याचे दिसून आले.

यानंतर प्रभाकरने कळमनुरी पोलिस स्टेशन गाठत याबाबत फिर्याद दिली. यानंतर पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांनी बहाणा करून मोठ्या शिताफीने नितीनला ताब्यात घेतले.

आरोपीने अनेकांना गंडविल्याची शक्यता

सदर आरोपी नितीन हा चाणाक्ष असून उच्च विद्या विभूषित आहे. यामुळे अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी संपर्कात आल्यावर फोटोचा गैर वापर करीत काम अडलेल्या लोकांना हेरून डाव साधत असे. भुसंपादन रक्कम, वाळू गौण खनिज प्रकरणी अडकलेले वाहन आदी प्रकारात सापडलेल्या लोकांकडून पैसे उकलण्याचे काम करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

आरोपीकडून अशा प्रकारे अनेक लोकांना गंडविले गेल्याची चर्चा तहसील परिसरात होत आहे. या घटनेचा पुढील तपास कळमनुरी पोलिस करत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button