कोळसा टंचाईला राज्य सरकारच जबाबदार : रावसाहेब दानवे | पुढारी

कोळसा टंचाईला राज्य सरकारच जबाबदार : रावसाहेब दानवे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाने कोळशाची कृत्रिम टंचाई केली आहे. त्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली असून, याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केला.

पुण्यातील रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्य सरकारला बाहेरून कोळसा, वीज खरेदी करायला, आमची हरकत नाही. देशात निधीचा मोठा तुटवडा आहे. केंद्र सरकारची जबाबदारी कोळसा पुरविणे आहे. तर शेतकऱ्यांना वीज पुरविणे ही राज्याची जबाबदारी आहे. आम्ही लोडशेडिंग करणार नाही, राज्याचे केंद्राकडे ३ हजार कोटी थकबाकी आहे, मात्र, त्यासाठी आम्ही कोळसा थांबाविलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.  कोळशाचा दर १०  हजार मेट्रिक टन आहे. आम्ही २ हजार मेट्रीक टन दरानुसार देतो तरीही राज्याला परवडतील असे नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

रेल्वे ट्रॅक शेजारी असलेल्या अतिक्रमणाबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, अतिक्रमणे हटविण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, आम्ही कोर्टात गेलो नाही, अतिक्रमणवालेच कोर्टात गेले होते. त्यावर कोर्टाने हे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान आम्ही करणार नाही.

हडपसर रेल्वे स्थानकाबाबत दानवे म्हणाले की, रेल्वे खात्याकडे पैशाची कमी नाही, रेल्वेला ११ हजार कोटींचे बजेट आहे, पैशा वाचून कोणत्याही स्टेशनचे काम बाकी राहणार नाही. हडपसर रेल्वे स्थानकाच्या बाकी राहिलेल्या कामाबाबत दानवे म्हणाले, “महाराष्ट्र हे अमर, अकबर आणि अँथनीचे  सरकार आहे. राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे”.

सर्वांनी हनुमान चाळीसा वाचली पाहिजे. राणा दाम्पत्यावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील लोक हल्ले करत आहेत. त्यामुळे ही राज्यातील कायदा व्यवस्था कोलमडली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button