

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ले केले जात आहेत; पण आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही. आमच तोंड बंद होणार नाही. सरकारचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढत राहू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २३) येथे दिला.
यावेळी फडणवीस म्हणाले, सरकारच्या भ्रष्टाचारावर कुणी बोललं, तर त्याला जीवे मारून टाकू, अशा प्रकारची प्रवृत्ती वाढू लागली आहे. अशा धमकीला पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्येही आम्ही घाबरलो नाही. इथंही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही.२०० ते ३०० लोकांनी एखाद्यावर हल्ले करणे, हे पोलिसांच्या भरवशावर हल्ले होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मोहित कंबोज यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मदतीसाठी कंबोज आले असावेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मोहित रेकी करायला आले होते, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
हेही वाचलंत का ?