आता ‘सेवा हमी’ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी | पुढारी

आता ‘सेवा हमी’ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी

पुणे: पुढारी वृत्तसेवा 
 शिक्षण विभागात आता सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करण्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी  अधिसूचना काढली. असून, आतापर्यंत काही मोजक्या असलेल्या सेवा 35 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. राज्यात सेवा हमी कायदा 2015 मध्ये लागू करण्यात आला. शिक्षण विभागाचाही त्यात समावेश होता. मात्र, त्याअंतर्गत दिल्या जाणार्‍या सेवा मर्यादित होत्या. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या सेवांचे विस्तारीकरण केले आहे.
या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. या सेवा जास्तीत जास्त एक ते सात दिवस, तसेच राज्य मंडळाशी संबंधित सेवा मंडळाने निश्चित केलेल्या कालावाधीनुसार देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देणे, गुणपत्रक देणे, शाळा सोडल्याचा दाखला देणे, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी देणे अशा एकूण 35 सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सेवा हमी अधिनियम राज्यात लागू झाल्यानंतर प्रत्येक मंत्रालयीन विभागाने काही सेवा या अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. मात्र, तेवढ्याच सेवा देणे अपेक्षित नसून त्या व्यतिरिक्त नागरिकांच्या गरजेनुसार प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा अधिसूचित करणे अपेक्षित आहे. 1 मेपासून सेवा प्रत्यक्ष संबंधितांना दिल्या जातील या दृष्टीने कार्यवाही पूर्ण करून ठेवावी, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी संचालक, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आदी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
सेवा हमी कायद्याची शिक्षण विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांशी संबंधित सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात शिक्षण संस्था, शिक्षण विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संबंधित सेवाही समाविष्ट केल्या जातील.
– सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त
हेही वाचा

Back to top button