दत्तात्रय नलावडे
वेल्हे : छत्रपती शिवरायांचे राजपरिवारासह सर्वाधिक काळ 25 वर्षे वास्तव्य असलेल्या, तसेच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून जगभर दरारा असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याच्या पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील शिवपट्टण परिसरातील उत्खननात शिवरायांच्या भव्य राजवाड्याचे अवशेष प्रकाशात आले आहेत. आधुनिक काळाप्रमाणे स्वच्छतागृह, उत्कृष्ट बांधकाम शैली यामध्ये दिसून आली आहे.
शिवरायांचा मोठा वारसा प्रथमच मोठ्या प्रमाणात समोर आल्याने पुरातत्त्व खात्यासह पुरातत्वीय संशोधक, इतिहास अभ्यासकही आश्चर्यचकित झाले आहेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत उत्खनन करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्खननात सापडलेल्या शिवकालीन बांधकामाचे अवशेष, वस्तू तसेच नाणी आदींचे संशोधन करण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे.
परकीयांच्या तसेच ऐतिहासिक कागदपत्रांत शिवपट्टण या स्थळाचा उल्लेख आहे. राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवपट्टण वाडास्थळाच्या उत्खननास दि. 3 मार्च रोजी सुरुवात झाली. एक एकर क्षेत्रात उत्खनन करीत असताना आसपासच्या परिसरातही बांधकामाचे अवशेष सापडले. त्यामुळे शेजारच्या क्षेत्रावर उत्खनन करण्यात येत आहे. उत्खननात भव्य राजवाड्याच्या शिवकालीन बांधकामाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.
वाड्यात आधुनिक काळाप्रमाणे स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, फरबंदी, विटा, कौल आदी अवशेष सापडले आहेत. शिवरायांनी चलनात आणलेल्या शिवराई नाणी तसेच बहामनी काळातील नाणीही सापडली आहेत. शिवपट्टण परिसरात शिवरायांचा भव्य राजवाडा तसेच शिवकाळात वसाहत असलेले स्वतंत्र गाव असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने शिवपट्टणकडे लक्ष केंद्रित केले आहे.
शिवपट्टण परिसरातील उत्खननात अपेक्षेपेक्षा भव्य वाड्याच्या बांधकामाचे अवशेष तसेच विविध वस्तू, साहित्य सापडले आहेत. या वस्तू, साहित्य तसेच बांधकामाचे सखोल संशोधन करून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दि. 30 एप्रिलपर्यंत खोदकाम करण्यात येणार आहे.
– विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्त्व विभाग, पुणे