‘एफडीए’ची औषध दुकानांवर कारवाई | पुढारी

‘एफडीए’ची औषध दुकानांवर कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा: विविध नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकलवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळून 105 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द केले, तर 392 स्टोअरचे निलंबन केले आहे.
यापैकी सर्वाधिक कारवाई पुणे जिल्ह्यात केली असून, त्यामध्ये 195 जणांचे निलंबन, तर 68 जणांचा परवाना रद्द केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध विभागाने ही कारवाई केली आहे. संपूर्ण पुणे विभागात म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ही कारवाई झाली असून, सर्व जिल्ह्यात मिळून एकूण 2 हजार 325 स्टोअर्सचे ‘केआरए’ (मूलभूत नियम) तपासण्यात आल्याची माहिती  सह-आयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.
सांगली येथे 264 मेडिकल तपासण्यात आले. त्यातील 81 जणांचे निलंबन, तर 12 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. सातारा येथे 245 पैकी 16 जणांचे निलंबन, तर एकाचा परवाना रद्द केला. सोलापूरमध्ये 173 केआरए तपासले, त्यातील 35 जणांचे निलंबन केले, तर 10 जणांचे परवाने रद्द केले आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया

यामध्ये सर्वाधिक तपासण्या पुणे जिल्ह्यात झाल्या असून, सर्वाधिक निलंबन तथा परवाना रद्दची कारवाईही पुणे जिल्ह्यातच झाली. यामध्ये 1 हजार 296 नमुने पुणे जिल्ह्यात तपासण्यात आले. त्यामध्ये आक्षेपार्ह आढळल्याने 195 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 68 परवाने रद्द करण्यात आले आहे. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये 346 स्टोअर तपासण्यात आले. त्यातील 65 जणांचे निलंबन, तर 14 जणांचे परवाने रद्द करण्यात आले.
हेही वाचा

Back to top button