नाशिक : जात पडताळणीचे 874 प्रकरणे निकाली; सामाजिक समता सप्ताह | पुढारी

नाशिक : जात पडताळणीचे 874 प्रकरणे निकाली; सामाजिक समता सप्ताह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर ’सामाजिक समता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्त नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जात प्रमाणपत्र पडताळणीचे 874 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शैक्षणिक प्रकरणांचा समावेश आहे.

विशेष मोहिमेत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज जातपडताळणी समितीकडे https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरलेले होते. मात्र, अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिकच्या नागरी सुविधा केंद्रात सादर केलेली नव्हती, अशा अर्जदारांचे त्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत आवाहन करण्यात येऊन जमा करून घेण्यात आले आहेत. अर्जदारांसह पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याद्वारे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, विशेष मोहिमेत निकाली काढण्यात आलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्यांना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा बाविस्कर व उपआयुक्त वाघ आदी उपस्थित होते.

महाविद्यालयांसाठी कार्यशाळा
नाशिक जिल्ह्यातील सर्व विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य व जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंढे महाविद्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर, उपआयुक्त तथा सदस्य माधव वाघ व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव प्राची वाजे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

Back to top button