आता महाविद्यालयांमध्ये मिळणार संविधानाचे धडे | पुढारी

आता महाविद्यालयांमध्ये मिळणार संविधानाचे धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; संपूर्ण देशाचा कारभार भारतीय संविधानावर चालतो. मात्र, आजच्या तरुण पिढीला संविधानाची ओळख नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून दिली आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परीक्षा, प्रवेश आणि इतर कामकाजासंदर्भात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीसाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांची ओळख पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना व्हावी, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आपल्या न्याय्य हक्कांची, अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, यासाठी संविधान सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणून शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून दिली जाणार आहे. या संदर्भात सविस्तर स्वतंत्र माहिती विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच परिपत्रक जारी केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी?
संविधानाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा विषय सर्व विद्यापीठांतील विद्याशाखांसाठी अनिवार्य केला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button