पुणे : शेतकर्‍यांना तुरुंगात डांबून मोजणीला गती; शेतकर्‍यांकडून निषेध 

मोई (ता. खेड) येथे मंगळवारी जमीन मोजणी करण्यात आली.
मोई (ता. खेड) येथे मंगळवारी जमीन मोजणी करण्यात आली.

चाकण : पुढारी वृत्तसेवा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार्‍या रिंगरोडच्या दुसर्‍या टप्प्यातील पूर्व रिंगरोडच्या जमीन मोजणी प्रक्रियेला गती मिळाली आहे. ज्या खेड तालुक्यातून शेतकर्‍यांनी आंदोलनातून मोठा विरोध केला; त्या भागातील शेतकरी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात असतानाच अत्यंत वेगाने येथील संपूर्ण मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालवले आहेत.

सरकार 'आवळा देऊन कोहळा काढतयं'

खेड तालुक्यातील मोई भागात मंगळवार (दि. 18) पासून जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. 22 एप्रिलपूर्वी सर्व गावांची मोजणी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. तालुक्यातील केवळ कुरुळी आणि केळगाव येथील मोजणी राहिली असून, ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे समजते. खेड तालुक्यातील धरणांपासून कारखानदारीपर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन व पुनर्वसन करण्यात आजवरचा सरकारचा अनुभव 'आवळा देऊन कोहळा काढणे' या म्हणीप्रमाणे आहे. त्यामुळेच रिंगरोडच्या मोजणीला काही शेतकरी तीव्र विरोध करीत असल्याची स्थिती समोर येत आहे.

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध विरोधाचा सूर आळवून तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र, कायदेशीर कचाट्यात आलेले शेतकरी तुरुंगात असतानाच प्रशासन जमीन मोजण्या उरकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांची संमती असल्याचे सांगत विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आक्रमक आंदोलनाकडे प्रशासन व राजकीय मंडळींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या भूसंपादनास विरोध असणार्‍या शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

…तत्पूर्वी मोजणी पूर्ण होणार

मागील पंधरवड्यात दि. 8 एप्रिल रोजी प्रांत कार्यालयात झालेल्या गोंधळानंतर 70 जणांवर गुन्हे दाखल करून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल असल्याने अटक करण्यात आलेल्या आंदोलकांचा मुक्काम अजूनही तुरुंगात आहे. या भागात मोजणी करण्यापूर्वी येथून विरोध होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी आधीच घेण्यात आली होती. काही व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मोजणीला विरोध करण्याची मागणी होत असतानाच अचानक हे ग्रुप "दम"दार सूचना प्रशासनाकडून मिळाल्यानंतर रातोरात बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. आक्रमकपणे विरोध करणारे शेतकरी तुरुंगात असतानाच प्रशासनाने मोजणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

शेतकर्‍यांनी मोजणीसाठी सहकार्य केले. स्थानिक शेतकर्‍यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून, खेड तालुक्यातील कुरुळी आणि केळगाव येथील मोजणी पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.

                                                                      – विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी, खेड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news