भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला | पुढारी

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपच्या आमदारांचा एक महिन्याचा पगार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली. भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला पगार देणार आहेत.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाची बैठक झाली.

या बैठकीत भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे.

त्यानुसार भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करुन घ्यावे.

पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी ही विनंती मुख्यमंत्र्यांना करीत आहोत. असे आशिष शेलार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चिपळुन दौरा

राष्ट्रपतींनी आपल्याला चिपळूणची पूरपरिस्थिती पाहण्यास जावे, असे सांगितल्यानंतर आपण तातडीने चिपळूणमध्ये आलो आहोत. पुरामुळे चिपळूणची झालेली दयनीय अवस्था पाहिली.

याबाबत आपण राष्ट्रपतींसह केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देणार असून लवकरच केंद्राचे पथकही चिपळूणमध्ये येऊन पाहणी करणार आहे.

त्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना आश्‍वासित केले.

चिपळूणच्या इतिहासात महापुराच्या निमित्ताने राज्यपाल प्रथमच शहरात आले होते.

गुहागर येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मोटारीने दुपारी 3 वा. त्यांचा ताफा चिपळुणात दाखल झाला.

राज्यपाल येणार म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

 

Back to top button