पुणे : विजेचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पुणे : पुढारी वृत्तसेवा
विजेच्या उघड्यावरील वायरचा धक्का लागून एका चारवर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.2) दुपारी अडीचच्या सुमारास मिठानगर कोंढवा परिसरात घडली. शहजाद अमीर सय्यद (वय 4, रा. नवाझिश पार्क, मिठानगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी खोदकाम करणारे ठेकेदार, महावितरणचे अधिकारी अभियंता तसेच वायरमन यांच्या विरुद्ध चिमुकल्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबात वडील अमीर शौकत सय्यद (वय 28, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शहजाद बुधवारी दुपारी अरेबिक भाषेच्या शिकवणीसाठी गेला होता. मात्र शिकवणीला सुटी असल्यामुळे तो घराकडे परतत होता. नवाझिश चौक ते कुबा मस्जिद मिठानगर कोंढवा रोडवर ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे रस्ता खोदलेला होता. त्याच्या बाजूला लाईटचा फिटर पिलर होता, त्यामधील काही वायर बाहेर आलेल्या होत्या, त्याला त्या वायरमधून विजेचा धक्का लागला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
याबाबत शहजाद याचे वडील अमीर सय्यद म्हणाले, 'महापालिकेकडून ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यावेळी लाईटच्या वायर उघड्यावर पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी काम सुरू असल्याबाबत कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. तसेच तेथे कोणी व्यक्तीदेखील नव्हती.' अमीर सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.

