भागलपूर; पुढारी ऑनलाईन
बिहारमधील (Bihar) भागलपूर जिल्ह्यात झालेल्या स्फोटात ७ जण ठार झाले आहेत. तर ११ हून अधिक जखमी झाले आहेत. भागलपूर जिल्ह्यातील तारापूर पोलिस कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. फटाके बनविताना हा स्फोट झाला असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या स्फोटामुळे तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली. तर आजूबाजूच्या २-३ घरांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भागलपूर जिल्ह्याचे डीएम सुब्रत कुमार सेन यांनी दिली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री एका घरात भीषण स्फोट झाला. यात ७ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. यात ११ जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हा स्फोटक इतका भीषण होता की घराचे तुकडे अर्ध्या किलोमीटरपर्यंत उडाले होते. ढिगाऱ्याखाली शीला देवी, गणेश कुमार आणि एका सहा महिन्याच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सर्व मृत आणि जखमी हे काजवाली चौक, तातारपूर येथील रहिवाशी आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ढिगारा हटविण्याचे काम सुरु आहे.