जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्प मधून गेल्या ३६ ते ४० तासांपासून सलगपणे पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
हातनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात तसेच तापी व पूर्णा नदी पाणलोट परिसरात होत असलेल्या अतिपावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. प्रकल्प क्षमता 255 दलघमी असली तरी प्रकल्पात गाळाचे प्रमाण निम्मेच्या जवळपास असल्याने आणि पाण्याची आवक होत असल्याने सलग 36 ते 40 तासांपासून पाण्याचा विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जिल्ह्यात हतनूर, वाघुर व गिरणा असे तीन मोठे प्रकल्प आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग केला जातो. हतनूर प्रकल्पातून गुरुवारी रात्री 9 वाजेनंतर 41दरवाजे उघडून सुमारे एक लाख 30 हजार 665 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात होता. आवक कमी झाल्याने शुक्रवारी दुपारी 89 हजार 488 तर पुन्हा पाण्याची आवक लक्षात घेता प्रकल्पाच्या 41 दरवाजातून एक लाख 33 हजार 843 क्युसेक पाण्याचा विसर्ग शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केला जात होता.
हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत गेल्या चोवीस तासात 13 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 242. 86 दलघमी झाली आहे. तसेच शनिवार सकाळी नऊ दरम्यान पाण्याची आवक कमी झाल्याने 89 हजार 488 तर दुपारी 12 वाजेदरम्यान 72 हजार 572 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान दोन ते तीनवेळा प्रकल्पाचे 41 दरवाजे 12 ते 16 तास दरम्यान उघडण्यात आले होते. गेल्यावर्षी हतनुर प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने 14 जून 2020 रोजी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. मान्सूनमधील पहिला विसर्ग सुरु करण्यात आला होता. तद्नंतर 15 जुलै व ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 36 ते 41 दरवाजे 12 ते 24 तासांदरम्यान उघडून विसर्ग केला जात होता. परंतु यावर्षी प्रथमच सलग 36 ते 40 तासांपासून प्रकल्पाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येवून विसर्ग केला जात आहे.
प्रकल्पात पाण्याची आवक होते. त्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे. प्रकल्पात गाळाचे प्रमाण निम्मेच्या जवळपास नक्कीच आहे. प्रकल्पात पाण्याची साठवण करण्याची आवश्यकता 15 ऑगस्ट नंतर करावी लागते व पाण्याची आवक लक्षात घेता परिस्थिती नुसार पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे प्रकल्प अभियंता यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?