

पुढारी ऑनलाईन डेस्क : मीराबाई चानू हे नाव आज संपूर्ण देशात गाजतय. कामगिरीही तशीच आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या प्रारंभच मीराबाई चानू हिने ऐतिहासिक कामगिरीने केला आहे. ४९ किलाे वजनी गटात तिने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिप्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी चानू देशातील पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. जाणून घेवूया तिच्या क्रीडा प्रवासाबद्दल…
भावापेक्षाही अधिक ओझे उचलायची…
मणिपूर राज्यातील चानूला लहानपणापासून खेळाची विशेष आवड. तिची शरीरयष्टीही तशीच. लहानपणी डोक्यावरुन लाकडे वाहताना ही आपल्या भावापेक्षा अधिक ओझे उचलत असे.
नेमबाज होण्याचे तिचे स्वप्न होते. १४ वर्षांची असताना चानू ही फायरिंग रेंज आपले नाव नोंदविण्यासाठी गेली. मात्र यावेळी ते केंद्रच बंद होते. या केंद्राजवळ काही मुले वेटलिप्टिंगचा सराव करत होती. तिला हा खेळ कमालीचा आवडला. घरी जाताना तिने आपण वेटलिप्टिंगमध्येच करीयर करण्याचे, असा निर्धार केला होता, हा किस्सा चानूने मागील वर्षी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
मणिपूरच्या वेटलिफ्टर कुंजाराणी देवी यांचा आदर्श ठेवून चानुने सराव सुरु केला. त्यांच्याकडून प्रेरणा घेत तिने प्रत्येक वर्षी आपली कामगिरी उंचावत नेली.
२०१४ मध्ये तिने ४८ किलोग्रॅम वजन गटातील स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सुर्वण पदाकावर आपली मोहर उमटवली.
वेटलिप्टिंगचा जागतिक स्पर्धा असो की राष्ट्रकूल चानूची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली. कामगिरीतील सातत्यामुळे केंद्र सरकारने तिचा पद्मश्री पुरस्कार देवून गौरव केला आहे.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाने तिला हुलकावणी दिली. आपल्या कामगिरीने ती फारच निराश झाली होती. यातून बाहेर पडण्यास काही काळ जावा लागला.
यशस्वी हाेण्यासाठी खेळाडूची मानसिकताही तितकीच खंबीर असावी लागले, हे तिने अचूकपणे टिपले.
चानूने स्वत:मधील उणीवा शोधल्या. त्या कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
सरावावेळी झालेल्या दुखापतीमुळे तिला २०१८मधील आशिया स्पर्धेलाही मुकावे लागले होते. मात्र यामुळे ती हताश झाली नाही. टोकियो ऑलिम्पिक हेच आपले लक्ष्य ठेवले.
टोकियो स्पर्धेत पदक मिळवायचे यासाठी सरावात सातत्य ठेवले. गेली चार वर्ष तिने केलेली मेहनत अखेर सफल झाली आहे.
संपूर्ण देशवासीयांच्या मान उंचवावी अशी कामगिरी करत भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात तिने आपले नाव सुर्वणाक्षरात नोंदवले आहे.
अधिक वाचा