बारामती : पुढारी वृत्तसेवा
मुर्टी येथील निरा-मोरगाव रस्त्यावरील वर्दळीच्या ठिकाणच्या एटीएम मशिनची चोरी केल्याच्या घटनेचा अखेर छडा लागला. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. चोरी केलेले आरोपी राजस्थान मधील आहेत. बननवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना (वय ३४, रा. दातारामगड, जि. सिखर, राजस्थान) व बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी (वय ३०, ता. दातारामगड, जि. सिखर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांची टोळी बोलेरो व पिकअपचा वापर करून एटीएम मशिन चोरत होती. चोरी करण्यास या आरोपींचे काही साथीदार सामील आहेत. (बारामती एटीएम चोरी)
बारामती तालुक्यातील मुर्टी येथील टाटा इंडीकॅश कंपनीचे मशिन १६ जानेवारी रोजी पहाटे चोरीला गेले होते. या घटनेत ४ लाख १२ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून चालू होता. त्यांना वडगाव पोलिसांकडून सहकार्य केले जात होते. तपासात या गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मागोवा घेत रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता ही गाडी कारेगाव परिसरात असल्याचे दिसून आले. गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांनी माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित याच वाहनाचा वापर करत आहेत. (बारामती एटीएम चोरी)
बुधवारी (दि. २) रांजनगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मदतीने वाहनाचा शोध घेण्यात आला. पोलिसांच्या रेकाॅर्डवरील आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबुलाल चौधरी याच्यासोबत या वाहनाचा वापर करत होता. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. अधिक चौकशीत याच वाहनाचा वापर करून जवळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील एटीएम मशिन चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. या वाहनाची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यासंबंधी तपास केला असता हे वाहन चोरीला गेल्याची तक्रार मूळ मालकाने तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केल्याचे दिसून आले.
लोणी व्यंकनाथ परिसरात याच वाहनाचा वापर करून एटीएम चोरीचा प्रयत्न करण्यात आला. नगर-मनमाड रस्त्यावरील गरवारे चौक येथेसुद्धा असाच प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी तेथेच हे वाहन सोडून दिल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि सचिन काळे, संदीप येळे, वडगावचे यांच्यासह सहाय्यक फौजदार तुषार यांनी ही कामगिरी केली. (बारामती एटीएम चोरी)
पाच गुन्हे उघडकिस
या दोघांनी साथीदारांसह वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीसह नगर जिल्ह्यातील पारनेर, तोफखाना, श्रीगोंदा, नगर एमआयडीसी येथे याच पद्धतीचे चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचलतं का?