यवतमाळ : घनकचरा व्यवस्थापनात गैरप्रकार! नगराध्यक्षासह मुख्याधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश                                | पुढारी

यवतमाळ : घनकचरा व्यवस्थापनात गैरप्रकार! नगराध्यक्षासह मुख्याधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश                               

उमरखेड (जि. यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत नियमातील तरतुदींचा गैरवापर केल्याचा ठपका उमरखेडचे तात्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, लेखापाल, कंत्राटदार व पदाधिकाऱ्‍यांवर ठेवण्यात आला आहे. या सर्वांविरोधात तत्काळ गुन्हे  नोंदवा, असे आदेश नगरविकास मंत्रालयाने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्‍यांना दिले आहेत.

नगराध्यक्ष ससाणे हे उमरखेडचे विद्यमान आमदार आहेत. उमरखेड येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील परिसर विकसित करण्यासाठी कचऱ्‍याची विलगीकरण करून, विल्हेवाट लावण्यासाठी टिप्पर व पोकलेनचा वापर करावयाचा होता. त्यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या कामासाठी निविदा काढणे आवश्यक होते. मात्र, निविदा न काढता कामाच्या निवडीनुसार अधिनियमातील कलम ५८ (२ ) चा वापर करून काम सुरू करण्याचे आदेश नगराध्यक्ष ससाणे यांनी दिले होते.

तसेच कामाची देयके अदा करण्यापूर्वी, नियमानुसार झालेल्या कामाबाबत स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता घेऊन देयके अदा करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता कामाची देयके कंत्राटदारास अदा करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी सादर करण्यात आला. याप्रकरणात नगराध्यक्षांनी अधिनियमातील तरतुदींचा गैरवापर केल्याची तक्रार एमआयएमचे नगरसेवक शेख जलील कुरेशी यांनी नगर विकास मंत्रालयाकडे केली होती.

उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्‍यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल शासनास सादर केला होता. या अहवालात सदर प्रकरण संशयास्पद असल्याचे व पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास करण्याची सूचना केली होती. काम करणारे कंत्राटदार शासकीय कंत्राटदार नव्हते, मात्र, ओळखीच्या आधारे काम देण्यात आल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. त्या अहवालाच्या आधारे तत्काळ त्याच्यावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दुचाकी व कारचाही समावेश

घनकचरा हटविण्याच्या कामातील गैरव्यवहार या मुद्दयाबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिला. स्वच्छ सर्वेक्षणात ७ जानेवारी ते १३ फेबुवारी २०१८ या कालावधीत ६५ लाख ७० हजार ५३३ रुपयांचे बिल प्रदान करण्यात आले. घनकचरा वाहून नेण्यासाठी वापरलेल्या वाहनांमध्ये दुचाकी स्कूटर व कारचाही समावेश असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

हेही वाचलंत का? 

सदर निर्णय हा राजकीय द्वेषाने प्रेरित आहे. या विरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे.
– नामदेव ससाणे, माजी नगराध्यक्ष तथा आमदार, उमरखेड

Back to top button