Paithan : नाथसागर जलाशयात मृतावस्थेत आढळली महाकाय गर्भवती मगर | पुढारी

Paithan : नाथसागर जलाशयात मृतावस्थेत आढळली महाकाय गर्भवती मगर

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठणमधील (Paithan) नाथसागर जलाशयाच्या पाण्यामध्ये मंगळवारी सायंकाळी मृत अवस्थेत ७ फूट लांबीची महाकाय गर्भवती मगर आढळून आली होती. या मगरीचे बुधवारी दुपारी पैठण येथे वन्यजीव कार्यालयाच्या परिसरात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दहन करण्यात करण्यात आले. पशु चिकित्सालय विभागाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती दैनिक पुढारीशी बोलताना वन्यजीव विभागाचे विभागीय अधिकारी अमित कुमार मिश्रा यांनी दिली आहे.

पैठण (Paithan) येथील जायकवाडी (नाथसागर) जलाशयाच्या पाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मगरीचा मुक्तसंचार अधूनमधून आढळून येत असल्याचा प्रकार निदर्शनास येत होता. परंतु, नाथसागर धरणाच्या परिसरातील पक्षी अभयारण्याच्या क्षेत्रात ताजनापुर (ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर) येथे दि १ जानेवारी सकाळी एक मगर मृत अवस्थेत पाण्याबाहेर पडली असल्याची बातमी पैठण येथील  वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना काही प्राणीमित्राने दिली.

यामुळे तात्काळ सहाय्यक वन सुरक्षक अधिकारी डॉ राजेंद्र नीळ, पैठण वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर, वनरक्षक रूपाली सोळसे, कृष्णा राठोड, राहुल नरोडे, रामेश्वर बोडखे, प्राणीमित्र शुभम चौतमल  यांच्या मदतीने मृत अवस्थेतील मगर पाण्याबाहेर काढून पैठण येथील कार्यालयात आणण्यात आली. बुधवार रोजी दुपारी मृत मगरीचे शवविच्छेदन पशुसंवर्धन विभागाचे प्रदेशिक  सह आयुक्त डॉ संजय गायकवाड  सहाय्यक आयुक्त डॉ एस. के खासने, पशुधन विकास अधिकारी डॉ भुजंग, डॉ रोहित धुमाळ यांच्या पथकाने पूर्ण केले.

मगर गर्भवती असण्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वन्यजीव विभागाच्या नियमानुसार मृत मगरीचे दहन कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले. मगरीचा मृत्यू कशामुळे झाला हे अहवाल आल्यावर स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पक्षी अभयारण परिसरात वन्यप्राण्याविषयी काही चुकीच्या घटना घडत असल्यास या कार्यालयाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन  केले आहे.

Back to top button