पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन धरमशी बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय ७९ होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बाणेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
निगडी विद्युत दहिनीत उद्या (ता.०३) गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सूरज, धीरज, बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाबर मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथील होते. पिंपरी- चिंचवड शहरात ते स्थायिक झाले होते. रेशन फेडरेशनचे अध्यक्ष होते. गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. काळभोरनगरभागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. तीनवेळा ते नगरसेवक होते. 1992-93 मध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले.
तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे बाबर यांनी सलगदोनवेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये नव्याने निर्मिती झाली. शिवसेनेने बाबर यांना उमेदवारी दिली होती. बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला.
दरम्यान, 2014 मध्ये लोकसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बाबर यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला होता.
बाबर यांची मोठी राजकीय कारकीर्द होती. मागील दीड महिन्यापासून बाबर आजारी होते. दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.