पुणे / येरवडाः पुढारी वृत्तसेवा
धानोरी येथील भैरवनगर परिसरात तारण ठेवून घेतलेले 83 लाख रूपयांचे दोन किलो आठ ग्रॅम सोने एका सराफाच्या घरातून विश्वासू नोकरानेच चोरून पळ काढल्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. दागिने चोरी गेल्यानंतर आरोपींनी थेट राजस्थान येथील त्यांचे गाव गाठले होते. तांत्रिक विश्लेषण आणि खबर्यांनी दिलेल्या माहितीवरून चौघा आरोपींना पोलिसांनी राजस्थान येथून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोन्यापैकी 56 लाख रुपये किंमतीचे 1 किलो 406 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले आहेत.
मुकेश गोमाराम चौधरी (वय 22), रमेश रामलाल चौधरी (वय 27), भगाराम गोमाराम चौधरी (वय 38), जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय 38, सर्वजण रा. खुडाला, बाली राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एका विधिसंघर्षीत मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मुकेश चौधरी हा या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आहे. त्यानेच बनावट चावी तयार करून चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत केनाराम चौधरी (वय 42, रा., धानोरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार मुकेश चौधरी (रा. राजस्थान) व त्याच्या साथीदारांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केनराम यांच्याकडे पाच नोकर आहेत. हे सर्व नोकर राजस्थान मधील असून, त्यांना फिर्यादी यांनी धानोरीत भाड्याने खोली करून त्यांची राहण्याची सोय केली होती. तारण ठेवलेले सोने केनाराम हे दुकानातील लॉकरमध्ये ठेवतात. केनाराम यांचा विश्वासू नोकर मुकेश हा 10 डिसेंबर रोजी त्याचे नातेवाईक आजारी असल्याचे सांगून राजस्थानला गेला. पण, तो परत आला नाही. त्याला संपर्क केला असता त्याचाशी संर्पक देखील झाला नाही.
मुकेश याला केनाराम यांच्या सर्व व्यवसायाची माहिती होती. आठ महिन्यापुर्वीच त्याने घराची बनावट तयार करून घेतली होती. तसेच दररोज त्यांच्याकडून केनाराम यांच्या घराची रेकी केली जात होती. 27 डिसेंबर रोजी सुट्टी असल्यामुळे फिर्यादी हे हिशोब करण्यासाठी दुकानातील सोने घरी घेऊन गेले होते. ते सोने त्यांनी कॉटच्या खाली असलेल्या ट्रॉलित ठेवले होते. 29 डिसेंबर रोजी मुकेश व त्याच्या साथीदारांना ती संधी मिळाली. त्या दिवशी केनाराम कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर घरातील व्यक्ती देखील घर बंद करून टेरेसवर गेल्या होत्या. त्यावेळी केनाराम व त्याच्या साथीदारांनी बनावट चावीच्या साह्याने घर उघडून ट्रेमधील दागिने चोरी केले. त्यानंतर आरोपी राजस्थान येथे पळून गेले होते. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, विजय सावंत यांच्या पथकाने केली. यावेळी पीफोरचे राज राठोड यांनी देखील मदत केली.
आरोपींनी चोरी केल्यानंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार नाहीत याची सर्व खबरदारी घेतली होती. रेकी करण्यापासून बनावट चावी तयार करण्यापर्यंत नियोजन केले. चोरी करताना ते चोरी करून पळ काढण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांनी वेगळी भाड्याची रिक्षा वापरली. गल्लीबोलात रिक्षा उभी करून ते तेथून सराफाच्या घरापर्यंत चालत आले. चोरीचे दागिने पोत्यात टाकून परत चालत जात रिक्षा पकडून बाहेर पडले.
तपास करत असताना पोलिसांना देखील या प्रकरणाचा छडा लागत नव्हता. सीसीटीव्ही कॅमेर्यात ते कोठून आले आणि कोठे गेले हे दिसत नव्हते. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक कॅमेरे पाहिले. त्यावेळी पोलिस हवालदार दिपक चव्हाण, प्रफुल्ल मोरे यांना मुकेश दिसून आला.
आरोपी स्टेशन परिसराती मथुरा लॉजवर राहिले. तेथून आरोपी मुंबईला गेले. तेथे ते बहिणीजवळ राहिले. चोरी मुकेश याने केल्याचे समजल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलिस हवालदार दिपक चव्हण, यशवंत किर्वे, संदिप देवकाते, प्रफुल्ल मोरे यांच्या पथकाने राजस्थान येथील खुडाला पालना, ता.पाली.जि. राजस्थान येथे जावून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
मुकेश हा केनाराम यांचा विश्वासू नोकर होता. तो केनाराम यांच्याच गावाकडील रहिवाशी होता. चोरी करून मुकेश गावी गेला होता. चोरी झाल्याचे कळाल्यानंतर केनाराम यांना कळू नये म्हणून तो त्यांना व्हिडीओ कॉल करत होता. मात्र त्याचा हा बनाव जास्त दिवस पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही.