

तलासरी : उधवा ते संजान या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम तलासरी तालुक्यात सुरु करण्यात आले असून या कामाला विविध भागांत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. उधवा-तलासरी रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी गुरुवारी उधवा जांबलून पाडा येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्याचे काम रोखून धरले. भूसंपादनाचा योग्य मोबदला न देता खासगी मालकीच्या जमिनीतून रस्ता काढला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत काम बंद पाडले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित ठिकाणचे महामार्गाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
उधवा ते संजान राज्य मार्ग क्रमांक 73 किमी 45/800 ते 99/400 अंतरावर दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत सध्या महामार्गाचे काँक्रिटीकारणाचे काम सुरु आहे. हे काम खासगी कंपनीच्या कंत्राटी पद्धतीने सुरू असताना, काही ठिकाणी शेतकऱ्यांची मालकी जमीन रस्त्याच्या हद्दीत जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी ठेकेदारी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी व त्यांचे सहकारी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत सरकारी मोजणी, रस्त्याची रुंदी तसेच पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या हद्दीबाबत माहिती देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी या मोजमापांवर आक्षेप घेत, पूर्वी रस्त्यासाठी भूसंपादन झाले असल्याचा ठोस लेखी पुरावा सादर करा, अशी मागणी केली. भूसंपादनाचा कोणताही दस्तऐवज सादर न झाल्यास फेरमोजणी करून प्रत्यक्ष जागेवर स्पष्टता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
उधवा जबलुन पाडा येथे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण कामावरून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून खासगी मालकीच्या जमिनीतून जबरदस्तीने रस्ता काढला जात असल्याचा आरोप जमीनधारकांनी केला आहे. या रस्ते कामात काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील कंपाउंड, पोल व संरक्षक भिंती तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार होत असून तोडफोडीचा आदेश कुठे आहे? भूसंपादनाचा कोणताही अधिकृत पुरावा आम्हाला दाखवण्यात आलेला नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करावी, अशी वारंवार मागणी केल्याचे सांगितले. मात्र, प्रशासनाने जागेवर येण्याऐवजी आम्हालाच कार्यालयात बोलावले जात आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
परिसरात तणावाचे वातावरण
ठेकेदार कंपनीच्या काही माणसांकडून दादागिरी व धमकी दिली जात असून खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात असल्याचा आरोप करीत, आमची मालकी जमीन असून, जोपर्यंत कागदपत्रे स्पष्ट करत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने रोड मॅप, भूसंपादन कागदपत्रे, फेरमोजणी अहवाल व कायदेशीर आदेश स्पष्ट करावेत. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणताही लेखी आदेश, भूसंपादनाचा पुरावा किंवा मोबदला न देता काम सुरू करण्यात आले आहे. आधी योग्य मोबदला द्या व अधिकृत कागदपत्रे दाखवा त्यानंतरच काम सुरू करा. - कमलेश लाखान, शेतकरी.
प्रशासनाने दिलेल्या महामार्ग क्रमांक 73 नकाशा मोज मापानुसार आम्ही रस्त्याचे काम करत आहोत. ज्या शेतकऱ्यांना आक्षेप असेल अशा शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवावा, आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय करत नाही. आम्ही आमचे काम पूर्वीच्या सरकारी मोजणी भूसंपादन नुसारच काम करत आहोत.
गुलशन मीना, ठेकेदार कंपनी प्रकल्प व्यवस्थापक.