

मुंबई : मध्य रेल्वेने अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी रविवार 11 जानेवारीला मेन मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकदरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी दरम्यानची लोकल सेवा तब्बल साडेपाच तास बंद राहणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 15.55 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
घाटकोपर स्थानक येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
9 व 10 जानेवारीच्या रात्री कांदिवली येथे अप फास्ट मार्गावरील पॉइंट टाकण्यासाठी आणि तोडण्यासाठी रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 आणि डाउन फास्ट मार्गावर मध्यरात्री 1.00 ते पहाटे 4.30 पर्यंत मोठा ब्लॉक घेतला जाईल.
याव्यतिरिक्त, 10 व 11 जानेवारीला कांदिवली आणि मालाड स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर पॉइंट 101 जोडण्यासाठी ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर दुपारी 1 ते सकाळी 6.30 पर्यंत आणि अप स्लो मार्गावर दुपारी 1.00 ते दुपारी 4.00 पर्यंत असेल. या काळात काही सेवा रद्द राहतील.
रविवारी ठाणे - वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत वाशी, नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील. ठाणे येथून 10.35 ते 4.07 वाजेपर्यंत वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या रद्द राहतील. त्याचबरोबर पनवेल, नेरूळ, वाशी स्थानकांवरून ठाण्याकडे सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत जाणाऱ्या अप मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या पूर्णपणे रद्द असणार आहेत.