

मुंबई : विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने शाळा व खाजगी शिकवणी वर्गांसाठी लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांवर आता खासगी कोचिंग क्लासेस शिखर संघटनेने उघड विरोध नोंदवला आहे. सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयात कोचिंग वर्गांवर निर्बंध घालत जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसातच कोचिंग वर्गांच्या संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
स्पर्धा परीक्षा, शाळा आणि खाजगी शिकवणी वर्गांमधून विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला मानसिक ताण, तक्रारींची वाढती संख्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा व कडक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताणतणाव निर्माण होऊ नये यासाठी शाळा व खाजगी शिकवणी वर्गांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना लागू करत जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यावर ही संघटना आक्रमक झाली आहे.
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांवर कोणताही मानसिक ताण दिला जात नाही. बहुतांश कोचिंग वर्गांमध्ये आठवड्यातून एक दिवस, प्रामुख्याने रविवारी, आधीपासूनच सुटी असते. ज्या ठिकाणी ती नाही, तेथेही यापुढे साप्ताहिक सुटी दिली जाईल, असा दावा खाजगी कोचिंग क्लासेस शिखर संघटनेचे राज्य प्रवक्ते बंडोपंत भुयार यांनी केला.
कोचिंग वर्गांतील चाचण्यांबाबतही त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खाजगी शिकवणी वर्गांतील चाचण्यांचे निकाल कधीही सार्वजनिक केले जात नाहीत. ते केवळ संबंधित विद्यार्थी आणि पालकांना वैयक्तिकरित्या कळवले जातात. निकालांची तुलना किंवा प्रदर्शनाचा प्रकार कोचिंग वर्गांमध्ये होत नाही, असे भुयार यांनी स्पष्ट केले.
मानसिक आरोग्याबाबतही कोचिंग वर्गांची भूमिका सकारात्मक असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, कोचिंग क्लासेसचे संचालक आणि शिक्षक विद्यार्थीांना सातत्याने सकारात्मक मानसिक पाठबळ देत असतात. प्रत्यक्षात ते समुपदेशकाचीच भूमिका बजावत असतात. हे वास्तव शासनाने लक्षात घ्यायला हवे. दरम्यान, विद्यार्थ्यांवरील बहुतांश समस्या या शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आहेत. मात्र त्या अपयशावर चर्चा करण्याऐवजी उगाच खाजगी कोचिंग क्लासेसना या विषयात ओढले जात असल्याची भावना या विरोधातून स्पष्ट होत आहे.
शाळेतील तसेच खाजगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांमधील ताण तणाव कमी करण्यासाठी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या समित्या शासन गठीत करीत आहे त्या समित्यांमध्ये शिक्षणाधिकारी व शाळा संचालकांसोबत खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांच्या प्रतिनिधींची ही नेमणूक करण्यात यावी.
बंडोपंत भुयार, प्रवक्ते, खाजगी कोचिंग क्लासेस शिखर संघटना