

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
तथापि, जे अधिकारी , कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत त्यांना 10 जानेवारी रोजी अंतिम संधी देण्यात येत आहे. त्यांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्यांवर 11 जानेवारीपासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे,तर 16 जानेवारी रोजी 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेसाठी एकूण 1 कोटी 3 लाख 44,315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 10,231 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 64,375 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यासाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पहिला व दुसरा प्रशिक्षण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास काही अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य व बंधनकारक आहे.
मतदान प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहण्याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंतिम संधी देण्यात येत आहे. जे अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांनी विनाविलंब तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करावे व निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.