

मुंबई : जामनगर रिफायनरीकडे रशियन कच्चे तेल पाठवले गेल्याचे दावे रिलायन्स इंडस्ट्रीजने फेटाळून लावले आहेत. आपल्या जामनगर रिफायनरीला गेल्या तीन आठवड्यांपासून रशियन कच्चे तेल मिळालेले नाही आणि जानेवारी महिन्यात कोणतीही डिलिव्हरी होण्याची अपेक्षा नाही, असे कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. रशियन कच्च्या तेलाने भरलेले सुमारे 22 लाख बॅरल घेऊन तीन रशियन जहाजे जामनगरकडे येत आहेत, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने 2 जानेवारी रोजी दिले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ‘ब्लूमबर्ग’च्या या वृत्ताचा इन्कार केला आहे. हे वृत्त उघडपणे खोटे असल्याचे म्हटले असून, ते प्रसिद्ध झाल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे कंपनीने म्हटले आहेे.
‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात रिलायन्स इंडस्ट्रीजने हे स्पष्टीकरण दिले आहे. जहाजांच्या हालचालींचे ट्रॅकिंग सिग्नल संभाव्य गंतव्यस्थान दर्शवतात; मात्र त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी किंवा डिलिव्हरी निश्चित झाल्याचे सिद्ध होत नाही, हे त्यात निदर्शनास आणून दिले आहे
रशियन तेलावर अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लादण्यात आलेले कडक निर्बंध या पार्श्वभूमीवर हे वृत्त आले आहे. या निर्बंधांमध्ये जहाज वाहतूक, विमा आणि आर्थिक व्यवहारांवरील मर्यादा यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियन कच्चे तेल आयात केल्याबद्दल अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकी शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढले होते. अशा परिस्थितीत रिलायन्ससह भारतीय रिफायनऱ्या आपल्या खरेदी धोरणात बदल करत आहेत.