

BMC Election 2026 Mumbai Controversy: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी असतानाच भाजप नेत्याच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. तामिळनाडू भाजपचे नेते के. अन्नामलाई हे मुंबईत प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुंबईचा उल्लेख 'बॉम्बे' असा करत, “बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, तर आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असं विधान केलं. या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून, मराठी मतदारांमध्ये नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत सध्या मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा संवेदनशील ठरत असताना, अशा विधानामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्नामलाई यांनी आपल्या भाषणात ट्रिपल इंजिन सरकार या संकल्पनेचा पुरस्कार केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत भाजपचा महापौर असलेली सत्ता आल्यास मुंबईचा वेगाने विकास होईल, असा दावा त्यांनी केला.
अन्नामलाई म्हणाले की, “देशात केवळ मुंबईतच ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. मुंबईचं बजेट सुमारे 75 हजार कोटींचं आहे. चेन्नईचं बजेट 8 हजार कोटी, तर बंगळुरूचं 19 हजार कोटी आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवस्थापनासाठी सक्षम प्रशासनाची गरज आहे.” पुढील काही वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचं आणि कोस्टल रोड, उत्तर-दक्षिण भूमिगत कनेक्टिव्हिटीसारखे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट करत म्हणलं की, ''शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका...
पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या... अन्नामलाई शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! आणि मुंबई महाराष्ट्राचीच ! जय महाराष्ट्र!''