पालघर : ८० बालकांच्या रक्तात सापडले हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव, डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यात सर्वाधिक | पुढारी

पालघर : ८० बालकांच्या रक्तात सापडले हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव, डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यात सर्वाधिक

पालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यातील ८० बालकांच्या रक्तात हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डहाणू, विक्रमगड आणि तलासरी या तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालघर जिल्हा प्रशासन जागे झाले आहे.

पालघर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून हत्तीरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत मानवास होतो. सेप्टिक टँक, घाण / निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते. हे प्रमाण जास्त असल्याने या हत्ती रोगाने आता बालकांना पकडले आहे.

हात आणि पायाला सूज किंवा हत्तीपायासारखा डास चावल्यानंतर सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर ५ ते १० वर्षांनंतर लक्षणे दिसून येत असल्याने सुरुवातीच्या काळात रुग्ण याबाबत अनभिज्ञ राहतात. ऑक्टोबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण मोहिमेत ६ ते ७ वर्ष वयोगटातील निवडक लहान मुलांच्या तपासणीत डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यात सर्वाधिक २९ बालके संक्रमित (हत्तीरोग दुषित) आढळून आली आहेत. सन २०१६ ते २०२२ या कालावधीतील विविध सर्वेक्षणात या ३ तालुक्यात १४७ व्यक्ती हत्तीरोग संक्रमित आढळून आल्या आहेत.

या ३ तालुक्यात २५ मे ते ५ जून २०२२ या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी ६ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सभेत सांगितले.

डहाणू, तलासरी व विक्रमगडमधील प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्षे सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच अन्य तालुक्यात डास नियंत्रणाकरीता गाड्यांमार्फत सेप्टिक टँकमध्ये जळके ऑईल सोडणे, वेंट पाईपला जाळ्या बसविणे, घराबाहेर निचऱ्याचे पाणी साठून न राहणेकरीता शोष खड्डे तयार करणे व गटारांचे पाणी साचू न देता वाहते ठेवून तेथे डासानियंत्रणासाठी किटकनाशक/गप्पी माशांचा वापर करणे या बाबी महत्वाच्या असणार आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button